मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई विमानतळालाही बसला. दृष्यमानता कमी झाल्याने तब्बल नऊ विमाने अन्य विमानतळांवर वळविण्यात आली, तर शनिवारी मध्यरात्री १२.४२ ते पहाटे ५.२४ वाजेपर्यंत विमान प्रचलन पूर्णतः बंद ठेवण्यात आले.
जोरदार कोसळणाऱ्या सरींमुळे मुंबई विमानतळ शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेपर्यंत तब्बल पावणेचार तास बंद ठेवावे लागले, तर दृष्यमानता कमी झाल्याने या कालावधीत नऊ विमाने अन्यत्र वळविण्यात आली. त्यापैकी के.एल. ८७७ (ॲमस्टरडॅम-मुंबई) आणि व्ही.एस. ३५४ (लंडन-मुंबई) ही दोन विमाने अहमदाबाद विमानतळावर वळविण्यात आली. पावसाचा जोर ओसरताच ती पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाली. रविवारी पहाटे ५.२४ वाजल्यानंतर मुंबई विमानतळावरील सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र, पावसामुळे दिवसभर विमान उड्डाणांचे वेळापत्रक कोलमडल्याची माहिती सूत्रांनी दिली.