Join us  

महामुंबईत मुसळधार, वाहतुकीवर परिणाम; ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्येही विजांच्या कडकडाटासह बरसला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 8:19 AM

संततधारेमुळे काही ठिकाणी पाणी तुंबले, अनेक घरांत पाणी शिरले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने बुधवारी रात्रीपासून महामुंबई परिसराला झोडपून काढले. ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर होता. त्यामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. संततधारेमुळे काही ठिकाणी पाणी तुंबले, अनेक घरांत पाणी शिरले. रस्त्यांवरही पाणी तुंबल्याने वाहतूक रोडावली. रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याने गाड्या विलंबाने धावत होत्या. 

ठाणे जिल्ह्यात जोर; प्रवाशांची कसरतशहर परिसरात सकाळी साडेआठ ते साडेनऊ या एका तासात २६.४२ मि.मी., तर सायंकाळी चारपर्यंत ४४.६८ मि.मी. पावसाची नाेंद झाली. कल्याण-डोंबिवलीच्या सखल भागांत पाणी साचल्यामुळे रिक्षा प्रवाशांचे हाल झाले. रेल्वेस्थानक परिसरातही पाणी साचल्याने प्रवाशांना कसरत करीत फलाटावर जावे लागले. अंबरनाथ, बदलापूरसह आसपासच्या भागात सुरुवातीला पाऊस रिमझिम पडत होता.  अर्ध्या तासात त्याने जोर धरल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतुकीचा वेग मंदावला. कल्याण-बदलापूर रस्त्यावरील वाहतूक पावसामुळे संथगतीने सुरू होती.

मुंबई-नाशिक मार्गावर वाहतूककोंडीमुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाका येथे रस्त्यावर पावसाने खड्डे पडले होते. हे खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे गुरुवारी सकाळी  मुंबई-नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली होती. दुपारी दोननंतर नाशिकहून ठाण्याकडे येणारी वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या मार्गिकेवर काही प्रमाणात वाहतूक कोंडी होती.

नवी मुंबई, पनवेलमध्ये त्रेधा

नवी मुंबईसह उरण-पनवेल परिसराला गुरुवारी पावसाने चांगलेच झोडपले. सखल भागांत पाणी साचले होते. महापालिकेच्या अर्धवट कामांचा मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागला. नवी मुंबईतील सर्वांत वर्दळीचा भाग असलेल्या वाशी डेपो परिसरात पाणी साचल्याने ते काढण्यासाठी पंपांसह जेसीबीचा उपयोग करावा लागला. वाशीतील एपीएमसी बाजारात भाज्या, फळे घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांचीही मुसळधार पावसाने त्रेधातिरपीट उडवली.

पालघरमध्ये वाहतुकीला फटका 

जिल्ह्यातील किनारपट्टीसह अन्य भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवेलाही फटका बसला. पश्चिम रेल्वेच्या बोईसर आणि उमरोळी स्थानकांदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅकमध्ये पाणी साचल्याने सुमारे अर्धा तास ट्रेन उशिराने धावत होत्या. दुसरीकडे पालघर-मनोर, पालघर-बोईसरदरम्यान रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली. देहर्जे नदीपात्रातील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेला आहे. सफाळे परिसरात एका आदिवासीच्या घरावर आंब्याचे झाड पडून नुकसान झाले, तर डहाणूतील चिंचणी-पारगाव-आशागड रस्त्यावर मोठे झाड पडल्याने वाहतूककोंडी झाली होती. 

रायगडमध्ये ‘यलो अलर्ट’जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत गुरुवार सकाळपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या आनंदसरींमुळे शेतीकामांनी वेग घेतला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात दोन दिवसांचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. अलिबाग, महाड, पोलादपूर, नागोठणे, खोपोली, पेण या भागांत सतत पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसाच्या आगमनामुळे शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. मुरूड तालुक्यात गुरुवारी सकाळी ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावल्याने बाजारात शेकडोंच्या संख्येने खरेदी करण्याकरिता आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.

टॅग्स :मुंबईमुंबई मान्सून अपडेटहवामानमुंबई ट्रेन अपडेट