पावसाची जलदगती, लोकलची मंदगती; परतीच्या मान्सूनचे मुंबईत धुमशान, रस्ते-रुळ जलमय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 07:46 AM2024-09-26T07:46:59+5:302024-09-26T07:47:34+5:30
गुरुवारीही मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या मोसमी पावसाने बुधवारी सायंकाळी मुंबईत जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे सखल भागात पाणी साचले. पावसाचा लोकलवाहतुकीवरही परिणाम झाला. त्यामुळे घरी परतणाऱ्या नोकरदारांची त्रेधातिरपीट उडाली. अनेक स्थानकांवर रात्री उशिरापर्यंत लोकांची गर्दी होती. आज, गुरुवारीही मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यभरात तुफान पावसाने वेग पकडला आहे. त्याची प्रचीती बुधवारी आली. शहर आणि उपनगरांत बुधवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत पावसाचे धुमशान सुरू होते. रात्री आठपासून मध्य रेल्वेवरील ठप्प झालेली लोकलसेवा पूर्ववत होण्यासाठी रात्रीचे अकरा वाजले. भायखळा, करी रोड, चिंचपोकळी, परळ, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर येथे प्रवासी अडकून पडले होते.
रेड अलर्ट : मुंबई, पालघर,
ऑरेंज अलर्ट : ठाणे, रायगड
मुंबईतील शाळांना आज सुट्टी
हवामान खात्याने मुंबई परिसरात गुरुवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील सूचना बुधवारी रात्री मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आली.
शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होईल. नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी सहा दिवस संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या वेळेला मुंबई शहर उपनगरांत पावसाची शक्यता अधिक आहे - राजेश कपाडिया, वेगरिज ऑफ द वेदर