मुंबई : राज्यात पुणे, मुंबईसह सर्वत्र जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील भांडूप, कांजुरमार्ग आणि विक्रोळी येथील रुळांवर पाणी साचले होते. परिणामी लोकल सेवा खोळंबली होती. कुर्ला रेल्वे स्थानकापासून मुलुंड रेल्वे स्थानकापर्यंतच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली होती.
रात्री उशिरापर्यंत लोकलचा गोंधळ सुरु असल्याने घरी जाणा-या चाकरमान्यांना उशिर होत होता. शिवाय अप व डाऊन मार्गावरील मेल एक्सप्रेस, लोकल वाहतूकीलाही याचा फटका बसला. ही वाहतूक धीम्या गतीने धावत होती. दुसरीकडे पवईसह जेव्हीएलआर परिसरात झालेल्या मोठ्या पावसामुळे रस्ते वाहतूक कोंडीत सापडली होती.
अंधेरी सबवे येथे दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. एस. व्ही रोडने वाहतूक वळवण्यात आली. दरम्यान, मुलुंड, विक्रोळी पट्टयात ठिकठिकाणी पाणी साचले होते. गेल्या काही वर्षांत पावसाळा संपताना एवढा मोठा पाऊस कधीच पडला नव्हता. २६ जुलैसारखा पाऊस पडत होता, अशी माहिती कांजुरमार्ग येथील नागरिकांनी दिली.
सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या सुटी जाहीर भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला उद्या (दिनांक २६ सप्टेंबर २०२४) सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या गुरूवार दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.