मुंबईत मुसळधार पाऊस,अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; पुढील ५ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 01:34 PM2023-06-28T13:34:15+5:302023-06-28T13:42:35+5:30

हवामान खात्याच्या वतीने पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे.

Heavy rains in Mumbai, traffic jams at many places; appeal to be alert for the next 5 days | मुंबईत मुसळधार पाऊस,अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; पुढील ५ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबईत मुसळधार पाऊस,अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी; पुढील ५ दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

googlenewsNext

मुंबई: आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. पावसामुळे मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर बांद्रापासून ते अगदी अंधेरीपर्यंत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. अंधेरी बोरिवली दिशेने वाहनांच्या लांबच लांब रांगा पश्चिम द्रुतगती मार्गावर पाहायला मिळत आहेत. तसेच ठाणे, नवी मुंबई, पालघर जिल्हात देखील जोरदार पाऊस सुरु आहे.

हवामान खात्याच्या वतीने पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या विभागातील ज्या सखल भागात पाणी साठण्याच्या किंवा तुंबण्याची शक्यता आहे तेथे प्रत्यक्ष जाऊन आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ करण्याच्या सूचना सर्व सबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांकडून देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर राज्यातील इतर भागातही चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. 

पुणेकरांनो पुढील चार दिवस पावसाचे

पुणे शहरात मंगळवार हा पावसाचा दिवस ठरला. दिवसभर झालेल्या रिमझिम पावसाने रस्त्यांवर पाणी साठले. मान्सून सक्रिय असल्याने पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून, येत्या २४ तासांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, येत्या चार-पाच दिवसांमध्येही हीच स्थिती राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

रायगड जिल्ह्यात पहाटेपासून धो-धो पाऊस

रायगड जिल्ह्यात बुधवारी पहाटे पासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे. ढगांचा गडगडाटसह मुसळधार पाऊस पडत आहे. आंबेनळी घाटात रात्री रस्त्यावर दरड कोसळली होती. त्यामुळे दोन्ही कडची वाहतूक ठप्प झाली होती. रिस्क्यू पथकाने दरडीचा काही भाग काढला असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू झाली. मात्र, यानंतर आंबेनळी घाट दोन्ही बाजूकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आलेला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस, सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३० जून पर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. मंगळवारी रात्रीपासून  सुरू झालेल्या पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच सध्या भात शेतीच्या कामांना जिल्ह्यात वेग आला आहे. जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत हळूहळू वाढ होत आहे. सलग आठवडाभर जोरदार पाऊस झाल्यास नदी, ओहोळामधील पाणी वाढणार आहे. पावसाने जोर धरल्याने नागरिकांना पाणी टंचाई पासून मुक्ती मिळणार आहे. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: Heavy rains in Mumbai, traffic jams at many places; appeal to be alert for the next 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.