तलाव क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी, कोरोना संकटात मुंबईकरांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 02:51 AM2020-07-10T02:51:17+5:302020-07-10T02:51:45+5:30
जून महिना संपूर्ण कोरडा गेल्यामुळे पाण्याबाबत काळजी वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या आठवड्यात केवळ सात टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यात पावसाने तलाव क्षेत्रात जोर धरला आहे.
मुंबई : मुसळधार पावसाने तलाव क्षेत्रात हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांत तलावातील पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. गुरुवारपर्यंत एकूण दोन लाख ८९ हजार १५७ दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. म्हणजेच आता २० टक्के जलसाठा जमा आहे.
जून महिना संपूर्ण कोरडा गेल्यामुळे पाण्याबाबत काळजी वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या आठवड्यात केवळ सात टक्के जलसाठा शिल्लक होता. मात्र जुलै महिन्याच्या दुसºया आठवड्यात पावसाने तलाव क्षेत्रात जोर धरला आहे. त्यामुळे चार दिवसांत तलावांच्या पातळीत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा जलसाठा मागील दोन वर्षांच्या तुलनेत निम्मा आहे. तरीही तूर्तास पालिका प्रशासनाने पाणीकपातीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी १ आॅक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित असते. गेल्या वर्षी ९ जुलै रोजी तलावांमध्ये चार लाख ७९ हजार ९४२ दशलक्ष लीटर जलसाठा होता. तर ९ जुलै २०१८ रोजी पाच लाख ५० हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता. मुंबईकरांना दररोज तीन हजार आठशे दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सध्या तलावांमध्ये दोन महिने पुरेल इतका जलसाठा जमा आहे.