मुंबई : शहर, उपनगरात सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवार दुपारपर्यंत झोडपून काढले. सांताक्रुझ-वाकोला येथे नाल्यात घर कोसळून दोघींचा मृत्यू झाला. दुसरीकडे पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवली येथे दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी साडेसहाला घडलेल्या या घटनेनंतर येथील वाहतूक संध्याकाळी सहाच्या सुमारास जवळपास बारा तासांनी हळूहळू पूर्वपदावर आली.
मुसळधार पावसामुळे सांताक्रुझ वाकोला येथील धोबीघाटमधील ६९४ आणि ६९५ या घरांचे बांधकाम मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास लगतच्या नाल्यात कोसळले. या दुर्घटनेत जान्हवी मिलिंद काकडे या दीड वर्षांच्या मुलीसह रेखा काकडे (२६) यांचा मृत्यू झाला. तर, चेंबूर येथील माहुल रोडवरील एका घरावर ४ आॅगस्टच्या पहाटे अडीच वाजता झाड कोसळले. यात दोन मुले जखमी झाली.पावसामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गासह लाल बहादूर शास्त्री मार्गावर अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली. दादरयेथील हिंदमाता आणि माटुंगा येथीलगांधी मार्केटमध्ये कंबरेएवढे पाणी साचले होते. वरळी बीडीडी चाळीसह अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले. साचलेल्या पाण्यामुळे काही ठिकाणी बेस्टचे मार्ग बदलण्यात आले. रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली होती. मुंबईत दुपारनंतर पावसाने थोडी विश्रांती घेतली.मच्छीमार बोट बुडाली; दोघे बेपत्तामासेमारीसाठी गेलेली गोराईमधील लकीस्टार बोट मंगळवारी सकाळी बुडाली. उत्तन येथील किनाऱ्यापासून १६ किलोमीटर लांब खोल समुद्रात असताना ही बोट उलटली. यामध्ये १३ जण होते. यातील ११ जणांना ५ तासांनी उत्तनच्या गोडकिंग मच्छीमार बोटीवरील मच्छीमारांनी वाचवले, तर दोन जणांचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.आजही मुंबई, ठाणे, रायगडला अतिवृष्टीचा इशारापश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून बुधवारीही मुंबई, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांना भारतीय हवामान शास्त्र विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा प्रभाव म्हणून अरबी समुद्रावर पश्चिमेकडून येणाºया वाºयाची गती वाढली आहे.त्यामुळे मुंबई, ठाणेसह कोकणात बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस होईल.