मुसळधार पावसाने मंदावला मुंबईचा वेग; सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीलाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:17 AM2018-07-04T01:17:34+5:302018-07-04T01:18:08+5:30
सोमवारी रिमझिम पडणाऱ्या पावसाने मंगळवारी चांगलाच जोर धरला. मुंबई शहरासह उपनगरात पहाटेपासून दुपारी २ वाजेपर्यंत बरसलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाली.
मुंबई : सोमवारी रिमझिम पडणाऱ्या पावसाने मंगळवारी चांगलाच जोर धरला. मुंबई शहरासह उपनगरात पहाटेपासून दुपारी २ वाजेपर्यंत बरसलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकलसेवा विस्कळीत झाली. तर रस्त्यांवर सखल भागात साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते वाहतूकही कोलमडली. परिणामी, दरदिवशी धावणाºया वेगवान मुंबईला मुसळधार पावसाने ब्रेक लावल्याचे चित्र होते.
सोमवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने वेग पकडला. मध्यरात्र उलटू लागली तसा पावसाचा वेग वाढला. मंगळवारी सकाळपासून पावसाने जोर पकडला असतानाच पश्चिम रेल्वेमार्गावरील अंधेरी येथील पादचारी पुलाचा भाग कोसळला. दक्षिण मुंबईत कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, भायखळा, लालबाग, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी आणि दादर परिसरात वाºयाच्या वेगाने बरसणाºया सरींमुळे मुंबईकरांचा वेग मंदावला. माटुंगा, सायनसह पूर्व उपनगरातील कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि पवई परिसरातही पावसाचा जोर कायम होता. पश्चिम उपनगरात बोरीवली, कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले आणि वांद्रे येथेही संततधार सुरूच होती.
मध्य रेल्वेमार्गावर सायन येथील रेल्वे रुळांवर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली. येथील लोकल २० ते २५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. हार्बर मार्गावरही अशीच काहीशी परिस्थिती होती. तर पश्चिम रेल्वेमार्गावर अंधेरी येथे पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने लोकलसेवा ठप्प होती. ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी सायंकाळ झाली.
पावसामुळे मुंबई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग पूर्णत: विस्कळीत झाला. भायखळा, परळ-हिंदमाता आणि माटुंगा येथील गांधी मार्केट या सखल भागात पाणी साचले होते. परिणामी, येथील रस्ते वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली. मुंबई शहर-उपनगरातील सर्व सखल भागात अशीच स्थिती होती.
दुपारी दोननंतर पावसाचा वेग कमी झाला. शहरासह उपनगरात सर्वत्रच पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर सखल भागातील पाणीही ओसरल्याने रस्ते वाहतूक पूर्वपदावर आली. रेल्वे वाहतूक मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत विलंबाने, धिम्या गतीनेच सुरू होती. सायंकाळनंतर मुंबईचे जनजीवन पूर्वपदावर आले.
शाळा लवकर सोडल्या
पावसाने जनजीवन विस्कळीत झालेच मात्र अंधेरीतील पूल दुर्घटनेने त्यात भर पडली. यामुळे मुंबईतील बहुतांश शाळा आणि महाविद्यालये तसेच त्यांच्या परीक्षांवर याचा परिणाम झाला.
मुसळधार पाऊस व कोलमडलेली रस्ते, रेल्वे वाहतूक यामुळे अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वेळेत शाळेत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे सकाळच्या सत्रातील शाळा या पावसाच्या जोरामुळे एक ते दीड तासातच सोडण्यात आल्या.
खबरदारी म्हणून पालक स्वत: शाळेत येऊन पाल्यांना घरी घेऊन जाताना दिसले. तर पावसाचा जोर आणि अंधेरी पूल दुर्घटनेमुळे खबरदारी म्हणून अनेक शाळांनी दुपारचे सत्र बंद ठेवले. मात्र शिक्षण विभागातर्फे शाळा बंद ठेवण्याच्या किंवा लवकर सोडण्याच्या कोणत्याही सूचना दिल्या नव्हत्या. अशा परिस्थितीत शिक्षण विभागाकडून सूचना येणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया अंधेरी पश्चिम येथील हंसराज मोरारजी शाळेतील शिक्षक उदय नरे यांनी दिली.
कुठे साचले पाणी :
मुंबई शहर : हिंदमाता, परळ टी.टी., गांधी मार्केट, मुख्याध्यापक भवन - शीव, शिंदेवाडी - भोईवाडा, परळ, कचरापट्टी जंक्शन - धारावी, स्वस्तिक चेंबर्स - चुनाभट्टी, बंटर भुवन - चुनाभट्टी.
पूर्व उपनगर : पोस्टल कॉलनी - चेंबूर, विक्रांत जंक्शन, पंतनगर - घाटकोपर,
हवेली ब्रिज - घाटकोपर, परेश पार्क मार्केट - विक्रोळी, कल्पना चौकी - भांडुप,
घास कम्पाउंड - साकीनाका.
पश्चिम उपनगर : अंधेरी सबवे,
अंधेरी पोलीस ठाणे, मेट्रो पुलाखाली, चिंचोळी रोड, बांगुरनगर, ओबेरॉय मॉल, दिंडोशी, दुर्गानगर - जोगेश्वरी, एम. के. रोड जंक्शन - अंधेरी.
येथे सरींवर सरी
कुलाबा, फोर्ट, नरिमन पॉइंट, भायखळा, लालबाग, गिरगाव, महालक्ष्मी, वरळी आणि दादर
माटुंगा, सायनसह पूर्व उपनगरातील कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि पवई
पश्चिम उपनगरात बोरीवली, कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे
नाल्यात एक जण
गेला वाहून
वांद्रे पश्चिमेकडील शास्त्रीनगर
गेट क्रमांक ३ येथील नाल्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती पालिका नियंत्रण कक्षाने दिली. दिवसभर शोध घेतल्यानंतरही त्याची माहिती मिळालेली नाही. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.
पाणी उपसण्यासाठी
५ पंपांचा वापर
स्वदेशी मिल, एलबीएस मार्ग, कुर्ला व अध्यापक नाला, धारावी येथे महापालिकेचे २ आणि रेल्वेचे ३ पंप लावण्यात आले. परिणामी, शीव (सायन) ते कुर्ला स्थानकांदरम्यान पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे झाला, असा दावा प्रशासनाने केला आहे.
पालिका सज्ज
मुंबई शहर व उपनगरात १७७ ठिकाणी उदंचन संच सुरू केले होते. मुख्य ६ उदंचन केंद्रांतील ३७ इतके संच वापरण्यात आले. सुरक्षेसाठी विभागीय सहायक आयुक्तांसह ७५० अधिकारी, ५३०० कर्मचारी हजर होते.
पावसाची नोंद
(परिसरनिहाय)
कुर्ला २०८ मिमी
विक्रोळी १९२ मिमी
एन विभाग १८४ मिमी
एफ/उत्तर १७६ मिमी
धारावी १७४ मिमी
वडाळा १६२
मरोळ १८३ मिमी
वर्सोवा १७५ मिमी
बोरीवली १७२ मिमी
(वेधशाळानिहाय)
कुलाबा वेधशाळेनुसार २ जुलै सकाळी ८ ते ३ जुलै सकाळी ८ पर्यंत सांताक्रुझ येथे १३१ मिमी तर कुलाबा येथे ७५ मिमी पावसाची नोंद. सकाळी ८:३० ते दुपारी २:३० कुलाबा - ३९, सांताक्रुझ - ८३ मिमी. पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
पावसाने बदलला हवाई वाहतुकीचा मार्ग
सोमवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका हवाई वाहतुकीलाही बसला. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाºया व या विमानतळावर लँडिंग करणाºया काही विमानांचा मार्ग बदलावा लागला. परिणामी प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला.
पावसामुळे धुके असल्याने व दृश्यमानता कमी असल्याने धावपट्टीवर उतरणाºया विमानांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे काही विमानांचा मार्ग बदलण्यात आला तर काही विमानांना धावपट्टी मोकळी होईपर्यंत काही काळ मुंबईच्या हवाई हद्दीत घिरट्या घालण्याचे निर्देश देण्यात आले.
दुपारपर्यंत ६ विमानांना घिरट्या मारण्याचे निर्देश देण्यात आले होते तर ४ विमानांचा मार्ग बदलण्यात आला होता. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मुंबईहून उड्डाण करणाºया एकूण विमानांच्या ५२ टक्के म्हणजे २३५ विमानांना सरासरी ४४ मिनिटांचा उशीर झाला.
सोमवारी दिवसभरात ६ विमाने रद्द करण्यात आली. मंगळवारी सायंकाळपर्यंत ४ विमाने रद्द झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विमानतळावर आगमन होणाºया विमानांपैकी २९ टक्के विमानांना म्हणजे १२९ विमानांना सरासरी अर्धा तास विलंब झाला.