मुंबई : धुरक्याचे साम्राज्य, कमाल तापमानासह आर्द्रतेमध्ये झालेली वाढ आणि पूर्वेकडून मुंबईकडे वाहणारे वारे, असे लक्षणीय बदल मुंबईच्या वातावरणात होत असतानाच, बुधवारी पहाटे ३च्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या पावसाने, मुंबई शहर आणि उपनगराला अक्षरश: झोडपून काढले.तब्बल दोनएक तास पडलेल्या पावसाची नोंद कुलाबा आणि सांताक्रुझ येथे अनुक्रमे ५८.६, १०३.२ मिलीमीटर एवढी झाली आहे, तर कुलाबा वेधशाळेने गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी, रात्री गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे.मागील तीन दिवसांपासून मुंबई शहरासह उपनगरातल्या वातावरणात उल्लेखनीय बदल होत आहेत. विशेषत: धूळ आणि धुके यांच्या मिश्रणाने तयार झालेल्या धुरक्याने मुंबईला वेढले आहे. परिणामी, मुंबई धूळयुक्त झाली आहे.मराठवाड्यातही जोर‘धार’मराठवाड्यात रेणापूर येथे बुधवारी अतिवृष्टी झाली असून औरंगाबादसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला़ मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़मुंबई आणि उपनगराचा विचार करता, शहरात ४३.३१, पूर्व उपनगरात ५१.५२ आणि पश्चिम उपनगरात ४०.७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा आणि सांताक्रुझ येथे कमाल तापमान अनुक्रमे ३३.५, ३५.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले, १०३.२ मिलीमीटर पावसाची नोंद, दिवसा उकाडा तर रात्री हवेत गारवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 5:10 AM