लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेला पाऊस सोमवारी मुंबईसह कोकणात दमदार बरसला. पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे.
दिवसभरात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. गेल्या २४ तासांत कुलाबा वेधशाळेत १८.४ मि. मी, तर सांताक्रूझमध्ये २.८ मि. मी पावसाची नोंद झाली. संपूर्ण कोकणाला झोडपून काढलेल्या पावसामुळे ओढे, नदी-नाल्यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले.
सोमवारी सकाळी मुंबई आणि उपनगरात जोरदार सरी बरसल्या. दुपारच्या सुमारास पावसाने उसंत घेतली, तर सायंकाळी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.
पुढील चार दिवस (१६ जुलैपर्यंत) कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. किनारपट्टीलगत सोसाट्याचे वारे वाहतील. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार, तर विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे.
.........
आतापर्यंतचा पाऊस (१ जूनपासून)
वेधशाळा.....पाऊस (मि. मी.)
कुलाबा..... ८३३.२
सांताक्रूझ..... ११०९.६
पणजी...... ११३१.१
पुणे...... १६७.४