Join us

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, अनेक भागांत साचले पाणी

By ravalnath.patil | Published: September 23, 2020 7:34 AM

मंगळवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे.

ठळक मुद्देदादर, वरळी, सायन, घाटकोपर, साकीनाका आणि चेंबूर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे.

मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईला पुन्हा एकदा चांगलेच झोडपले आहे. मंगळवारी सायंकाळपासून तुफान पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरात काही ठिकाणी भागांत पाणी भरले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मुंबईत मंगळवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर वाढला. मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार पाऊस पडत आहे. दादर, वरळी, सायन, घाटकोपर, साकीनाका आणि चेंबूर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. गोरेगावमध्ये अनेक रस्ते जलमय झाले आहेत. मालाड, अंधेरी, खार या भागांतही पाणी साचले असून बेस्टने अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे. याबाबत मुंबई पालिकेने  ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. 

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) येत्या २४ तासांत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे व रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पालघरमधील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

मंगळवारी रात्री ९ वाजल्यापासून सांताक्रुझ वेध शाळेत १०६.६ मिमी पावसाची नोंद झाली. तर सकाळी ८ वाजल्या पासून १२८.२ मिमी पावसाची नोंद झाली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई शहरात ७३.५२, पूर्व उपनगरात २७.८७ आणि पश्चिम उपनगरात ७८.६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दादर, धारावी, वडाळा, महालक्ष्मी, कुलाबा, चेंबूर, कुर्ला, मालाड, मालवणी, कांदिवली, अंधेरी, वांद्रे, वर्सोवा, पार्ले येथे मुसळधार पावसाची नोंद झाली.

मध्य रेल्वेची लोकल वाहतूक ठप्पमध्य रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.  सायन ते कुर्ला, चुनाभट्टी ते कुर्ला या स्थानकादरम्यान पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची अत्यावश्यक सेवेतील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. तर पश्चिम मार्गावरील लोकल वाहतूक चर्चगेट ते अंधेरी दरम्यान ठप्प झाली आहे. 

बेस्टने अशी वळवली वाहतूक...- उड्डाणपुलमार्गे हिंदमाता व भोईवाडा मार्गे शिवडी- भाऊ दाजी रोडमार्गे गांधी मार्केट- सायन मेन रोडमार्गे सायन रोड २४- मर्निया मस्जिद मार्गे मालाड सबवे (पूर्व व पश्चिम)- लिंकिंग रोडमार्गे वांद्रे टॉकीज, जुना खार- भगत सिंह नगरमार्गे शास्त्री नगर, गोरेगाव- जेव्हीपीडी लिंकिंग रोडमार्गे अंधेरी मार्केट सबवे

 

 

टॅग्स :मुंबईपाऊसमुंबई मान्सून अपडेट