Join us

मुंबईसह राज्यभरात जोरदार पाऊस, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 7:41 AM

मुंबई नगर आणि उपनगरांत जोरदार पावसाच्या जरी बरसू लागल्या आहेत. गुरुवारी रात्रीपासून पावसानं हजेरी लावली असून शुक्रवारी सकाळीदेखील संततधार पाऊस सुरू आहे. डोंबिवली ते शिळफाटा परिसरात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबई, दि. 15 - मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई शहर आणि उपनगरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, पवई, अंधेरी परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. नवी मुंबईतल्या ऐरोली भागात मुसळधार पाऊस झाला. तर डोंबिवली, कल्याण शीळफाटा भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक 10-15 मिनिटं उशिराने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तर शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांचीही गैरसोय होत आहे. अंबरनाथ-बदलापूरमध्ये पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे बदलापूर रेल्वे स्थानका रुळावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. 

दरम्यान, आठवडाभर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा मिळला आहे. गुरुवारी (14 सप्टेंबर) संध्याकाळीदेखील मुसळधार पावसानं हजेरी लावली होती.  अचानक कोसळलेल्या पावसामुळे कामावरून घरी परतणा-या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. फक्त एका तासात दादरमध्ये सर्वाधिक 44 मिमी पावसाची नोंद झाली. तर दादर, मिलन सबवे, खार सबवे, अंधेरी सबवे पोईसर सबवे, मालाड सबवे या भागांत पाणी साचल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेला 29 पंप सुरू करावे लागले होते.  

गुरुवारी संध्याकाळी कुठे, किती पाऊस पडला?दादर 44 मिमीवांद्रे 43 मिमीसांताक्रुझ 41 मिमीअंधेरी 38 मिमीकुर्ला 32 मिमीशीव 23 मिमीवरळी 23 मिमीभायखळा 25 मिमीपरळ 22 मिमीचेंबूर 26 मिमीदिंडोशी 17 मिमीकांदिवली 15 मिमी