लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जोरदार हजेरी लावत मुंबईकरांची दाणादाण उडवणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारी ओसरला. दिवसभर काही भागांमध्ये जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी बरासल्या. मात्र रायगड, पुणेसह राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट तर मुंबईत ऑरेंज अलर्ट मुंबई हवामान खात्याने जाहीर केला आहे. बुधवार आणि शुक्रवारी मुंबईतील काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदर सरी कोसळण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
शनिवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांतील घरे पाण्याखाली गेली होती. मात्र मंगळवारी पावसाचा जोर ओसरल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री जीटीबी नगर येथील सलामती हिल, दरडीचा भाग कोसळला. यामुळे तीन-चार घरांमधील १६ नागरिकांना पालिका शाळा स्थलांतरित करण्यात आले. उर्वरित १२ रहिवाशी आपल्या नातेवाईकांच्या घरी गेले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.
हवामान खात्याचा अंदाज
हवामान खात्याने जाहीर केल्यानुसार पुढील दोन दिवस पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मुंबईत बुधवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस काही भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शॉर्टसर्किट, पडझड
मुसळधार पावसामुळे मुंबईत दिवसभरात तब्बल १९ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. यापैकी शहरात ११, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी चार ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. सुदैवाने यात कोणालाही इजा झालेली नाही.
झाड पडून तरुण जखमी
मुंबईत २१ ठिकाणी झाडे व फांद्या पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये मुलुंड पूर्व येथील नवघर व्हिलेज, गल्ली क्रमांक दोनमध्ये झाड पडून गांधी पटेल (वय ३८) हे जखमी झाले. त्यांच्यावर हिरामोंगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.