मुसळधार पावसामुळे भांडूप जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद; मुंबईच्या बहुतांश भागांतील पाणीपुरवठा बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 04:46 PM2021-07-18T16:46:02+5:302021-07-18T16:46:32+5:30

मुंबई महानगर क्षेत्रात काल रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडूप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडूप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवली.

Heavy rains shut down water purification system in bhandup Water supply disrupted in most parts of Mumbai | मुसळधार पावसामुळे भांडूप जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद; मुंबईच्या बहुतांश भागांतील पाणीपुरवठा बाधित

मुसळधार पावसामुळे भांडूप जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद; मुंबईच्या बहुतांश भागांतील पाणीपुरवठा बाधित

googlenewsNext

मुंबई- भांडूप जलशुद्धीकरण संकूल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रे बंद करावी लागली. या कारणाने मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश भागांमध्ये आज (दिनांक १८ जुलै २०२१) होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. दरम्यान, संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पाणीपुरवठा झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात काल रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडूप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडूप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पावसाचे पाणी शिरले. या कारणाने तांत्रिक समस्या उद्भवली. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठादेखील खंडित करावा लागला. भांडूप संकुलातील या समस्येमुळे मुंबई महानगर क्षेत्रात बहुतांश परिसराला आज होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने शहर आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. पूर्व उपनगरांमध्येदेखील अंशतः पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

भांडूप जलशुद्धीकरण संकुलात शिरलेले पावसाचे पाणी तातडीने उपसून गाळणी (filtration) व उदंचन (pumping) यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येत आहे. संबंधित संयंत्राची पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती केली जात आहे. आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उपायुक्त अजय राठोर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी भांडूप संकुलात उपस्थित आहेत.

संकुलातील पेयजल उदंचन यंत्रणा काही तासातच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळूनच प्यावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा बाधित होऊन झालेल्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहे. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे .
 

 

Web Title: Heavy rains shut down water purification system in bhandup Water supply disrupted in most parts of Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.