मुंबई- मुंबईकरांची मंगळवार सकाळची सुरूवात पावसाने झाली आहे. मुंबईमध्ये सकाळपासूनच तुरळक पाऊस सुरू झाला असून ऑफिसला निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. माटुंगा, दादर, लालबाग, परळ गिरगाव, भायखळा तसंच इतर भागात सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पाऊस सुरू झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंबईत पावसाने पुनरागमन केलं आहे. संध्याकाळी चार-साडेचारच्या सुमारास पावसाला सुरूवात होते. पण आज सकाळीच पाऊस पडालया सुरूवात झाली आहे.
मुंबईबरोबरच नवी मुंबईमध्येही पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच पनवेलमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे.
मंगळवारपासून पुढचे चार दिवस महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे. चार दिवसांपूर्वीही हवामान खात्याने 5 ऑक्टोबरपासून 15 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. पण आता येत्या 4 दिवसातच हा पाऊस महाराष्ट्रात बरसण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. हा पाऊस आणखी काही दिवस असाच बरसण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.
दुहेरी वातावरणाने मुंबईकर त्रस्त-शुक्रवारी दुपारी आणि शनिवारी सायंकाळी मुंबईत पावसाने विजांच्या कडकडाटासह मुसळधार हजेरी लावली. तत्पूर्वी दुपारी मात्र येथे कडाक्याचे ऊन पडले होते. रविवारीही पावसाने असाच कित्ता गिरवला. दुपारी पडलेल्या कडाक्याच्या उन्हानंतर सायंकाळी पावसाने पुन्हा उपनगरात काही ठिकाणी हजेरी लावली. दिवसा ऊन आणि सायंकाळी पाऊस अशा दुहेरी वातावरणाला मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे.