मुंबई - मुंबईतील वाहनांची अधिकृत आकडेवारी ४३ लाख, पार्किंग करण्याजोगी आवश्यक जागा २७ लाख आणि प्रत्यक्षात उपलब्ध जागा ६० ते ७० हजार अशी बिकट परिस्थिती, त्यात ठिकठिकाणी असलेले खड्डे, पायाभूत सुविधांमुळे खोदून ठेवलेले रस्ते यांची भर, त्यामुळे मुंबईतील रस्त्यांवर बहुतांश ठिकाणी वाहतूक कोंडीची बेटे निर्माण झाली असून देशाच्या आर्थिक राजधानीची अवस्था ट्रॅफिकची तुंबई, अशी झाली आहे. त्यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक कासवगतीने सुरू असल्याचे चित्र आहे.
मुंबईत गेल्या पाच वर्षांत वाहनांची संख्या १० पटींनी वाढली आहे. प्रतिकिमी १९०० वाहने असे विषम प्रमाण त्यामुळे निर्माण झाले आहे. मुंबईत वाहनांची वाढती संख्या आणि ठिकठिकाणी सुरू असलेली विकासकामे, अनधिकृत पार्किंग यामुळे वाहतूक कोंडी होते. या कोंडीत अडकल्यामुळे वाहनचालकांना लेटमार्क लागतो. इंधन जास्त वापरले जाते, खर्चही वाढतो.
मुखर्जी चौक (रिगल सिनेमा), काळाघोडा, जोहर चौक (भेंडी बाजार), नाना चौक, हाजी अली, ए. एच. अन्सारी चौक (खडा पारसी), हिंदमाता, खोदादाद सर्कल, दादर टीटी, वडाळा ब्रिज, राणी लक्ष्मीबाई चौक (सायन स्थानक), खेरवाडी जंक्शन (कलानगर), सुमन नगर जंक्शन, छेडानगर, अमर महल जंक्शन, चेंबूरनाका, जिजामाता भोसले मार्ग जंक्शन, दत्ता सामंत चौक (साकीनाका), हिरानंदानी पवई, सी. डी. बर्फीवाला मार्ग (जेव्हीपीडी), डी. एन. नगर, चारबंगला, चकाला, बेहराम बाग जोगेश्वरी, आरे कॉलनी, दिंडोशी ए. के. वैद्य जंक्शन, समता नगर जंक्शन, इनॉर्बिट मॉल न्यू लिंक रोड यांचा समावेश आहे.
यामुळे होते कोंडी...
- रस्त्यांवरील खड्डे, पायाभूत सुविधांची कामे
- मार्गिका कमी असल्याने इतर मार्गिकांवर ताण
- वाहन संख्या प्रमाणापेक्षा जास्त
- पार्किंग सुविधेची अनुपलब्धता
चुनाभट्टी ते बीकेसी उड्डाणपूल हा सायन धारावी या परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी करण्यात आला. मात्र हा पूल सुरू झाल्यानंतर बीकेसीतील भारतनगरसारख्या नवीन ठिकाणी वाहतूककोंडी होऊ लागली. फरक इतकाच की, एका ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आता दुसऱ्या ठिकाणी होत आहे.
पायाभूत सुविधांची कामे सुरू असताना उपलब्ध मार्गिका चांगल्या स्थितीत असाव्यात. अनधिकृत पार्किंगवर कारवाई करणे गरजेचे असून वाहनचालकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. - डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूक तज्ज्ञ
वाहनांची संख्या वाढत असून त्याऐवजी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारायला हवी. मायक्रो बस संकल्पना राबविल्यास वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होईल. - सुधीर बदामी, वाहतूक तज्ज्ञ