मुंबई : मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा कोस्टल रोड प्रकल्प पूर्ण सेवेत येण्यास मे महिना उजाडणार आहे. परंतु वरळी ते मरीन लाइन्सदरम्यान चार लेनची एक मार्गिका लवकरच खुली करण्यात येणार आहे.
सोमवारी रात्रीपर्यंत या कोस्टलच्या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांची चाचणी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ही मार्गिका खुली केली जाण्याची शक्यता आहे. ही मार्गिका १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खुली केली जाणार होती.
मात्र, मोदी यांचा या आठवड्यातील दौरा रद्द झाल्याने लोकार्पण सोहळा पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातील थडानी जंक्शन वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानची सफर करण्यासाठी मुंबईकरांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्पाचा शुभारंभ ऑक्टोबर २०१८ मध्ये झाला. २०२२ पासून कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला गती आली असून, सद्यस्थितीत ८६ टक्के काम पूर्ण झाले आहे.
१) भूमिगत पार्किंगमध्ये अमर सन्स येथे - २५६, महालक्ष्मी मंदिर व हाजीअली- १,२०० तर वरळी सी फेस येथे - ४०० वाहन क्षमता.
२) मार्गावर वेग मर्यादा ताशी ८० ते १०० किमी.
३) कोस्टल रोड प्रकल्पामुळे इंधनाची ३४ टक्के, तर वेळेची ७० टक्के बचत होणार आहे.
४) दक्षिण मुंबईचा प्रवास ४५ मिनिटांचा प्रवास दहा मिनिटांत होणार आहे.
५) याठिकाणी एक फुलपाखरू उद्यानासह उद्याने व मैदाने विकसित करण्यात येणार आहेत.
६) बोगदे ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग’ तंत्रज्ञानाने बनवण्यात आले आहेत.
७) आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास प्रवासी आणि वाहने सुरक्षितरीत्या बाहेर काढता येणार आहेत.
कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणात तीन लेनची एकच बाजू सुरू करण्यात येणार आहे. यामुळे वरळीहून मरीन ड्राइव्ह येथे जाता येणार आहे. हा मार्ग सकाळी ८ ते रात्री ८ असाच सुरू राहणार आहे.
एका मार्गिकेचे काम पूर्ण :
चार लेनच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. कोस्टलवरील हाजी अली जंक्शनजवळ असलेला उड्डाणपूल आणि कोस्टल रोडवर २५ टन वजन ठेवून ही चाचणी करण्यात आली असून ती ७२ तास चालली.
कोस्टल रोडअंतर्गत येणाऱ्या पोलिस आणि वाहतूक पोलिसांकडून याची पाहणी करण्यात आली. मार्गिकेचे उद्घाटन झाले की मुंबईकरांना कोस्टलच्या या मार्गिकेची सफर करता येणार आहे.