मीरारोड - मीरारोडच्या सेव्हन स्कवेअर शाळा ते कॅनवुड पार्क रस्त्या लगतच्या नाल्यांवर लहान तसेच अवजड वाहनेसुध्दा उभी केली जात असल्याने स्लॅब कमकुवत झाला असून, मोठी झाकणे सुध्दा तुटून गेली आहेत. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली असून पालिकेने केलेला लाखो रुपयांचा खर्च सुद्धा वाया गेला आहे.येथील परिसरात पालिकेने मोठे नाले हे चक्क रस्त्याच्या समांतर बांधलेले आहेत. नाल्यांवरच स्लॅब व चेंबरवर मोठी काँक्रिटची झाकणे टाकली आहेत. परंतु सदर नाल्यांच्या स्लॅबवरच लहान कारचह नव्हे तर मोठ्या बस, ट्रक आदी अवजड वाहनं सुध्दा सर्रास उभी केली जात आहेत.नाल्यांवर पदपथ अपेक्षित असताना येथे नाल्यावर चक्क अवजड वाहनांची बेकायदा पर्किंग होत असताना महापालिकेसह स्थानिक लोकप्रतनिधींकडून सर्रास डोळेझाक सुरू आहे. त्यातच गेल्या आठवड्यात येथील एका विकासकाच्या निर्माणाधीन कामासाठी येणाऱ्या अवजड वाहनांच्या वजनांमुळे साई सिद्धी इमारत सामोरील काँक्रिट स्लॅबचे झाकणच तुटुन खाली नाल्यात पडले आहे. या प्रकरणीदेखील काहीच कार्यवाही केली गेली नाही.नाल्या वरील स्लॅबचे झाकण तुटल्याने नागरीकांना तसेच वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन ये - जा करावी लागत आहे. आधीच रस्ता बनवताना त्यात कडेला उंच पदपथ बनवण्याऐवजी रस्ता समांतर नाला बनवण्यात आला आहे. त्यातच अवजड वाहनांमुळे स्लॅब धोकादायक बनला असून, चेंबर ची काँक्रिटची झाकणे सुद्धा अवजड वाहनाने तोडली असताना कारवाई होत नसल्याबद्दल रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
अवजड वाहनांमुळे पालिकेच्या नाल्याचे स्लॅब तुटल्याने अपघाताची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 7:16 PM