मुंबई : लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमुळे होत असलेले अपघात पाहता प्लॅटफॉर्मची उंची त्वरित वाढविण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आणि उशिराने जाग आलेल्या रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे काम सुरू असून, ८३ प्लॅटफॉर्म्सपैकी अवघ्या १३ प्लॅटफॉर्म्सची उंचीच आतापर्यंत वाढवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मार्च २0१६ पर्यंत उंची वाढवण्याचे टार्गेट पूर्ण करणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मध्य रेल्वेमार्गावर ७६ स्थानके असून, एकूण २७३ प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यापैकी जलद मार्गावर ३0 प्लॅटफॉर्म्स आणि तर धीम्या मार्गांवर २४३ प्लॅटफॉर्म्स आहेत. ८४0 एमएम आणि त्यापेक्षा अधिक उंची असलेले १९0 प्लॅटफॉर्म्स असून, त्यांची उंची बरोबर असल्याने ते वाढवण्यात येणार नाहीत. मात्र उर्वरित ८३ प्लॅटफॉर्म्सची उंची वाढवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या ८३ प्लॅटफॉर्म्सपैकी २४ प्लॅटफॉर्म्सची उंची २0१५ च्या जून महिन्यापर्यंत वाढविण्यात येणार होती. मात्र या २४ पैकी अवघ्या १३ प्लॅटफॉर्म्सची उंची वाढवण्यात आल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. मुळात मार्च २0१६ पर्यंत सर्व प्लॅटफॉर्म्सची उंची वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, एकूणच काम पाहिले असता ८३ प्लॅटफॉर्म्सपैकी फक्त १३ प्लॅटफॉर्म्सचीच उंचीच वाढवण्यात आल्याने ७0 प्लॅटफॉर्म्सची उंची वाढवणे बाकी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पावसाळ्यातील तीन महिन्यांत हे काम होणार की नाही, असा सवालही उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)हे टार्गेट पूर्ण करणार कसे असा प्रश्न उपस्थित होत आहे.रेल्वेकडून आता पावसाळापूर्व कामांवर अधिक भर दिला जातो आणि पावसाळ्यात रेल्वेची सगळी कामे बंद केली जातात. हे पाहता 2015 च्या जून महिन्यार्पंत २४ प्लॅटफॉर्म्सची उंची वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी १0.५१ कोटी खर्च येणार आहे. आता २४ पैकी ११ प्लॅटफॉर्म्सचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले. 83पैकी उर्वरित ५९ प्लॅटफॉर्म्ससाठी ३१ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च येणार आहे.
१३ प्लॅटफॉर्म्सचीच उंची वाढली
By admin | Published: April 14, 2015 12:33 AM