मुंबई : इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, ते संथ गतीने सुरू असून, डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप करत, रिपब्लिक सेनेने महापरिनिर्वाण दिनी इंदू मिल येथे आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. मात्र, डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पुतळ्याची उंची एक इंचही कमी होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्यानंतर, आता रिपब्लिकन सेनेने आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे.मंगळवारी रात्री उशिरा ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस आश्वासन दिल्याने, आंदोलन तूर्तास स्थगित केल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी दिली. दादरच्या इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत डॉ. आंबेडकर यांचा ३५० फुटांचा जगातील सर्वांत मोठा पुतळा उभारण्यात येणार आहे, पण सरकारने अचानक स्मारकाची उंची कमी करत, २६१ फुटांचा पुतळा बांधायचा ठरविल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला होता. सरकार आंबेडकरी जनतेची फसवणूक करत असल्याने, ६ डिसेंबरला इंदू मिल येथे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर मंगळवारी रात्री तातडीची बैठक बोलावली होती. या वेळी स्मारकाच्या पुतळ्याची उंची एक इंचही कमी केली जाणार नसून, यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि एमएमआरडीएचे अधिकारी आणि स्मारकाचे वास्तुविशारद यांच्यासोबत आपण लवकरच बैठक घेणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
इंदू मिलमधील आंबेडकरांच्या स्मारकाची उंची एक इंचही कमी होणार नाही - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 1:56 AM