अग्निशमन दलाची उंची आता ८१ मीटरपर्यंत, पंचविसाव्या मजल्यावरील आग विझवणे होणार शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 04:05 AM2017-08-23T04:05:56+5:302017-08-23T04:06:09+5:30
उत्तुंग इमारतींमध्ये आग लागण्याची घटना वारंवार घडत असल्याने अग्निशमन दलापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे पंचविसाव्या मजल्यापर्यंत पोहोचून आग विझविणारी अत्याधुनिक शिडी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
मुंबई : उत्तुंग इमारतींमध्ये आग लागण्याची घटना वारंवार घडत असल्याने अग्निशमन दलापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे पंचविसाव्या मजल्यापर्यंत पोहोचून आग विझविणारी अत्याधुनिक शिडी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. या शिडीची उंची तब्बल ८१ मीटर आहे. याशिवाय अद्ययावत सहा फायर इंजीन, १७ जलद प्रतिसाद वाहनांनी अग्निशमन दल सुसज्ज बनले आहे.
गेल्या काही वर्षांत उत्तुंग इमारतींत आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र या इमारतींपुढे अग्निशमन दलाची उंची तोकडी पडत आहे. यावर मात करण्यासाठी अग्निशमन दल फिनलॅण्डवरून ३० व्या मजल्यावर पोहोचणारी शिडी खरेदी करणार होते. मात्र तूर्तास २५ व्या मजल्यापर्यंत पोहोचणारी शिडी दाखल झाली आहे. ८१ मीटर उंचीचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, १७ जलद प्रतिसाद वाहने, सहा फायर इंजीन अग्निशमन दलात नव्याने दाखल झाली आहेत.
भिंतीपलीकडील आगीवर नियंत्रण
अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेल्या वॉल थ्रॉट नोझलचा वापर करून भिंतीच्या पलीकडील आग भिंतीमध्ये नोझल टाकून विझवता येणार आहे. यामुळे इमारतीच्या आत प्रवेश न करता आगीवर नियंत्रण मिळवता येणार आहे. हाय प्रेशर गनच्या माध्यमातून आगीवर पाण्याचा फवारा करता येणार आहे. शिवाय कुठेही नेता येणारी पोर्टेबल रिचार्जेबल लाइट सुटकेस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जवानांचे काम आव्हानात्मक
मुंबई शहर हे समुद्रकिनाºयावर वसलेले आहे. त्यामुळे जसजसे आपण वर जातो तसतसा वारा वाढत असतो. त्यामुळे उंच ठिकाणची आग शिडीवरून विझवताना जवानांचा कस लागतो. मात्र अग्निशमन दलाचे जवान धैर्याने हे आव्हान पेलतात, असे गौरवोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी काढले.
तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक
आग आणि धुरामध्ये काम करण्याचे कौशल्य शिकवणारे प्रशिक्षण केंद्रही मुंबई अग्निशमन दलाच्या वडाळा कमांड सेंटरमध्ये सुरू करण्यात आले. या नव्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक या शिडीच्या लोकार्पण कार्यक्रमात करण्यात आले. या अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे आपत्कालीन स्थितीत मुंबईकरांना तत्काळ मदत मिळणे शक्य होणार आहे.
- वाहनांची रहदारी, अरुंद गल्ल्यांमध्ये जाणारी क्यूआरव्ही (जलद प्रतिसाद वाहने)
- वाहनाच्या टपावर दिलेली टॅलिस्कोपिक मास्ट हेड लाइट रिमोटद्वारे नियंत्रित करता येणार
- या दिव्याचा वापर ३६० अंशांमध्ये करता येणार आहे.
- १३६ किलो वजन पेलण्याची क्षमता असलेली फोल्डिंग शिडी
- क्यूआरव्ही वाहनांमधील इंजिनाच्या ऊर्जेवर हायप्रेशर पाण्याची लाइन चालू करणार
- वाहनांतील कंट्रोल पॅनलमार्फत सर्व कार्य सुरू राहणार
- विंच गिअर आपत्कालीन स्थितीत एक टनापर्यंत वजन वाहून नेणार तसेच अवजड वस्तू उचलण्यासाठी लिफ्टिंग बॅग
अवघड ठिकाणी जाणे होईल सोपे...
श्वसन उपकरण प्रशिक्षण केंद्र असलेले मुंबई अग्निशमन दल हे भारतातील पहिले अग्निशमन दल आहे. या प्रशिक्षण केंद्रामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांना आणि अधिकाºयांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेण्यास मदत होईल. आज ज्या १७ जलद प्रतिसाद वाहनांचे लोकार्पण झाले त्यांच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना चिंचोळ्या मार्गाने व अवघड ठिकाणी जाणे सोपे जाणार आहे. ही वाहने अग्निशमन दलाच्या यापूर्वीच्या वाहनांपेक्षा अधिक अद्ययावत आहेत. मिस्ट या तंत्रज्ञानाचा या वाहनांमध्ये वापर करण्यात येणार आहे. यासोबतच ६ फायर इंजीन आणि ८१ मीटर उंचीच्या हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म (शिडी) चे लोकार्पण करताना आनंद होत आहे.
- प्रभात रहांगदाळे, मुंबई अग्निशमन दलप्रमुख