मुंबई : घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरून अखेर दीड वर्षानंतर अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. या उड्डाणपुलावरील मोहिते पाटीलनगर जंक्शनजवळ अवजड वाहनांसाठी असलेले हाइट बॅरिअर हटवण्यात आले आहेत. याशिवाय अवजड वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी पुलाच्या दोन्ही टोकांना लावलेले काँक्रीट ब्लॉकही काढण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे शिवाजीनगर जंक्शन, बैगनवाडी जंक्शन आणि देवनार डम्पिंग जंक्शनवर वाहतूक कोंडीशी सामना करावा लागणार नाही.
उड्डाणपूल वाहतुकीस खुला केल्यानंतर अवजड वाहनांना प्रवेश नाकारत फक्त हलक्या वाहनात ये-जा करण्यात अनुमती दिली होती. उड्डाणपुलाची एक बाजू देवनार डम्पिंग ग्राउंडकडे उतरत असून, कचरा वाहून नेणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ट्रक व डंपरसाठी ती विशेष सोय करण्यात आली होती. मात्र, अवजड वाहनांना या पुलावर सध्या प्रवेश बंद असल्याने पुलावरून कचऱ्याच्या गाड्याही जाऊ शकत नव्हत्या. आता उड्डाणपुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाल्यानंतर या वाहनांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नामकरण बाकी :
या पुलाचे अद्याप नामकरण करण्यात आलेले नाही. या पुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, अशी भाजपची मागणी आहे, तर शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि समाजवादी पक्षाने सूफी संतांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील पुलावरून अवजड वाहने भरधाव येत असत. त्यामुळे चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. यामध्ये देवनार डम्पिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या कचऱ्याच्या वाहनांचाही समावेश असल्याने त्यांनाही वाहतूककोंडीशी सामना करावा लागत होता. या बंदीमुळे अवजड वाहतूक करणाऱ्यांमध्येही नाराजी होती. मात्र अखेर ही बंदी उठली आहे. - फय्याज आलम शेख, अध्यक्ष, गोवंडी सिटिझन वेल्फेअर फोरम.