मुंबई : लोकल आणि प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडून अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागतो. या घटनांनंतर न्यायालयाकडून सूचना केल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावरील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात येत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यावर भर दिला जात आहे. या कामांना गती देतानाच पश्चिम रेल्वेने विरारपर्यंतच्या स्थानकांतील प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी आॅगस्ट २०१७चा मुहूर्त निवडला आहे. तर मध्य रेल्वेकडून ५० स्थानकातील प्लॅटफॉर्मची कामे वेगाने केली जात असून, तिही आॅगस्टच्या आत पूर्ण केली जातील. ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडून दरवर्षी काही प्रवाशांचा जीव जातो तर काही प्रवासी गंभीर जखमी होतात. घाटकोपर येथे मोनिका मोरे या तरुणीला अपघातात दोन्ही हात गमवावे लागले आणि त्यानंतर प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा मागणी अधिकच जोर धरू लागली. यासंदर्भात न्यायालयाकडून प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याची सूचना रेल्वेला करण्यात आली. त्यानुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून गेल्या एक ते दीड वर्षापासून प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याची कामे केली जात आहेत. आतापर्यंत पश्चिम रेल्वेवरील ९२ प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्यात आली आहे. तर ५२ प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम वेगाने सुरू असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. विरारपर्यंत ही कामे आॅगस्ट २०१७पर्यंत पूर्ण करण्यात येतील. विरार ते डहाणूपर्यंत कमी उंचीच्या प्लॅटफॉर्मची कामे ही दुसऱ्या टप्प्यात घेण्यात येतील. मध्य रेल्वेमार्गावरीलही ५० स्थानकांतील प्लॅटफॉर्मची कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात असून, आठ महिन्यांत ती पूर्ण केली जातील. (प्रतिनिधी)>अपघात झाले कमीट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडून होणारे अपघात कमी झाले आहेत. २0१६मध्ये १३ जणांनी प्राण गमावले आहेत. तर १९ जण जखमी झाले. २0१५शी तुलना करता अपघात कमी झाल्याचे निदर्शनास येते. २0१५ या वर्षात ४0 जणांचा मृत्यू झाला होता. तर २६ जण जखमी झाले होते. यात बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत १३, चर्चगेट ७ आणि ठाणे रेल्वे पोलिस हद्दीत ३ जणांची नोंद झाली. आता हाच अपघाताचा आकडा कमी झाला आहे.
फलाटांची उंची वाढवणे पुन्हा लांबणीवर पडणार
By admin | Published: January 16, 2017 2:07 AM