मुंबई : खासगी विकासकामार्फत मेट्रो स्थानकालगतच्या बांधकामांना मेट्रो स्थानकातून जोडणी मार्ग धोरण मंजूर करण्यात आले आहे. या महत्त्वाच्या निर्णयासोबत मेट्रो प्रकल्प २ अ आणि ७च्या बहु वाहतूक परिवहन एकत्रीकरणाच्या अंमलबजावणीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.मुंबई महानगर प्रदेशात एकात्मिक तिकिटीकरण पद्धतीच्या अंमलबजावणीच्या सुधारित प्रस्तावास मंजुरी देतानाच मुंबई महानगर प्रदेशात अग्निशमन सेवा स्थापन करण्यास मंजुरी मिळाली आहे.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १४९ वी बैठक मंगळवारी नगर विकास मंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्यासमवेत पार पडली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीत प्राधिकरणाचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी विविध विषयांचे सादरीकरण केले. यावेळी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, यात मेट्रोशी संबधित अनेक निर्णयांचा समावेश आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाच्या उंचीवाढीस सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर झाली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रोप वे मार्गिकेत केलेल्या सुधारणेस तसेच प्रकल्प अंमलबजावणीची मंजुरी देण्यात आली आहे. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या ई ब्लॉकमधील इमारतीच्या पुनर्विकासास तत्त्वत: परवानगी देण्यासाठीही मंजुरी मिळाली आहे. याशिवाय वांद्रे-कुर्ला संकुलातील जी ब्लॉकमधील मनोरंजनाच्या जागेसह टेकडी भूखंडाच्या विकासाकरिता एजन्सीची नियुक्ती करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे. सिटीपार्क, वांद्रे कुर्ला संकुल ते महाराष्ट्र निसर्ग उद्यानदरम्यान ५५० मीटर पादचारी झुलत्या पुलाच्या अंमलबजावणीस मान्यता मिळाली असून वडाळा येथील अधिसुचित क्षेत्रामध्ये रुग्णालय, तसेच शाळा विकसित करण्यासाठी भूखंड वाटपाची निविदा मागविण्यासही मान्यता मिळाली आहे.या कामांना मिळाली मंजुरीसूर्या नदी पात्रातील एकूण५ बंधाऱ्यांच्या बांधकामासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळास ५० कोटींपर्यंत वित्तपुरवठा करण्यास मंजुरी मिळाली आहे.शिळफाटा व कल्याणफाटा येथील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या व कल्याण फाटा येथील भुयारी मार्गाच्या बांधकामाकरिता लागणाºया वाढीव खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.माथेरान येथे फ्युनिक्युलर रेल्वे प्रणालीची सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर अंमलबजावणीस, तसेच मुंबई महानगर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पाणीपुरवठा करण्याकरिता काळू धरण प्रकल्पातील वन जमिनीतील नक्त वर्तमान मूल्याची रक्कम अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.इंदू मिल येथील चबुतरा १०० फूट, तर पुतळा असेल ३५० फुटांचाभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवून पादपीठ ३० मीटर (१०० फूट) उंच व पुतळा १०६.६८ मीटर (३५० फूट) उंच अशी एकूण १३६.६८ मीटर (४५० फूट) उंची ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, स्मारकाचा चबुतरा १०० फूट व पुतळा ३५० फूट अशी बाबासाहेबांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची जमिनीपासून ४५० फूट होईल.१५ जानेवारी २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची ३५० फूट इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. या निर्णयामुळे या स्मारकाचा चबुतरा १०० फूट व पुतळा ३५० फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार आहे.पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे व लोखंडाचे प्रमाण वाढेल तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये ६.० मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील. या स्मारकामध्ये ६८ टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी ४०० लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग व कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच १ हजार लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.