नैसर्गिक मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या वारसांनाही आता अर्थसाहाय्य मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 04:05 AM2019-12-23T04:05:53+5:302019-12-23T04:06:01+5:30

तातडीने ५० हजारांचे अनुदान; दोन लाखांहून अधिक पोलीस कुटुंबीयांना दिलासा

The heirs of the police who have died naturally will now be financed | नैसर्गिक मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या वारसांनाही आता अर्थसाहाय्य मिळणार

नैसर्गिक मृत्युमुखी पडणाऱ्या पोलिसांच्या वारसांनाही आता अर्थसाहाय्य मिळणार

Next

जमीर काझी 

मुंबई : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय,’ या बिरुदावलीने राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाखांहून अधिक पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांना नैसर्गिक मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. पोलीस महासंचालक विशेष साहाय्यता निधीतून हे अनुदान तातडीने दिले जाईल.

पोलीस शिपाई ते सहायक फौजदार या दर्जापर्यंतच्या अंमलदारांच्या वारसांना ही मदत मिळेल. दिवंगतांच्या वारसांना शासनातर्फे मिळणारा निधी, मदतीव्यतिरिक्त ही रक्कम मदत म्हणून दिली जाईल. याची अंमलबजावणी तातडीने करावी, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना नुकतेच दिले आहेत.

विविध घटनांमध्ये ‘आॅनड्युटी’ मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शासनाकडून वेगवेगळे अनुदान, विम्याची रक्कम, तसेच पोलीस कल्याण निधीतून विविध स्वरूपात मृतांच्या वारसांना मदत दिली जाते. मात्र, अंमलदार जर नैसर्गिकपणे निधन पावल्यास यापूर्वी त्यांच्या वारसांना पोलीस कल्याण निधीतून अत्यल्प मदत दिली जात होती. त्यामुळे या रकमेच्या स्वरूपात वाढ करावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून अंमलदार वर्गातून केली जात होती. त्यानंतर, गेल्या महिन्यात ७ नोव्हेंबरला महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष साहाय्यता निधीच्या बैठकीत हा विषय उपस्थित झाला. त्यावेळी जायस्वाल यांनी अशा प्रकारे मृत्युमुखी पडणाºया पोलिसांचे कुटुंबीय आर्थिक विवंचनेत असतात. त्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याने, त्यांच्या वारसांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय शासन, विमा कंपन्यांकडून दिली जाणारी मदत, वेल्फेअर कल्याण निधीतून दिले जाणारे सानुग्रह, अनुदानही निर्धारित मुदतीमध्ये द्यावी, अशा सूचनाही महासंचालकांनी पोलीस घटक प्रमुखांना केल्या आहेत.
हा निधी मृत्युमुखी अंमलदाराच्या कायदेशीर वारसाला मिळण्यासाठी संबंधित पोलिसांचे मृत्यूचे प्रमाणपत्र, त्यांच्या कायदेशीर वारसदारांच्या नोंदीबाबतचा अभिलेख, घटक प्रमुखांच्या बॅँक खात्याबाबतचा सविस्तर तपशील, त्यासाठीची शिफारस तातडीने पोलीस प्रमुखांनी महासंचालक कार्यालयात पाठवावयाची आहे. त्यानंतर, हा निधी संबंधित वारसदारांना दिला जाणार आहे. याशिवाय नक्षलग्रस्त भागात किंवा ड्युटीवर असलेल्या ठिकाणी शत्रूंशी, समाजकंटकांबरोबर प्रतिकार करताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना घटनेनुसार निश्चित केलेली रक्कम दिली जाईल. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंमलबजावणी तातडीने होणार
विविध घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना शासनातर्फे विविध स्वरूपाची मदत दिली जात होती. मात्र, नैसर्गिकपणे निधन पावणाºयांच्या वारसांना निर्धारित स्वरूपाशिवाय असा कोणताही लाभ मिळत नसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ५० हजार रुपये अनुदान दिल्याने बिकट प्रसंगी त्यांना थोडा-फार हातभार मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे. - सुबोधकुमार जायस्वाल, पोलीस महासंचालक

Web Title: The heirs of the police who have died naturally will now be financed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.