Join us

हेलिकॉप्टरमधून होणार मुंबई दर्शन!

By admin | Published: October 03, 2015 2:59 AM

परदेशी पर्यटकांबरोबरच मुंबईकरांनाही हेलिकॉप्टरमधून मुंबईचे दर्शन घडावे यासाठी एमटीडीसीने (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) हेलि टूरिझमची कल्पना आखली.

मुंबई : परदेशी पर्यटकांबरोबरच मुंबईकरांनाही हेलिकॉप्टरमधून मुंबईचे दर्शन घडावे यासाठी एमटीडीसीने (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ) हेलि टूरिझमची कल्पना आखली. या टूरिझमची पहिली सेवा ४ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. सुरुवातीला पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून उत्तर मुंबईचे दर्शन घडवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतरच नवे नियोजन केले जाईल, असे एमटीडीसीकडून स्पष्ट करण्यात आले. या हेलि टूरिझममध्ये १५ मिनिटांसाठी प्रत्येक पर्यटकामागे ४,७५0 रुपये आकारणी केली जाणार आहे. सुरुवातीला उत्तर मुंबईचे दर्शन हेलिकॉप्टरमधून घडवण्याचे नियोजन आखण्यात आले असून, यासाठी एमटीडीसीने गिरीसन एअरवेज प्रायव्हेट लिमिटेडशी करार केला आहे. १५ मिनिटांत हेलिकॉप्टरमधून पर्यटकांना दर्शन घडेल. जुहू येथून हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर वर्सोवा, मढ आयलंड, फिल्मसिटीसह अन्य स्थळांचे दर्शन पर्यटकांना हेलिकॉप्टरमधून घडणार आहे. सध्या ४ आॅक्टोबरपासून प्रत्येक रविवारी हेलि टूरिझमची सेवा पर्यटकांना आणि मुंबईकरांना मिळेल. प्रत्येक रविवारी हेलिकॉप्टरच्या १२ फेऱ्या होणार आहेत. याबाबत एमटीडीसीचे साहसी क्रीडा व्यवस्थापक सुबोध किनळेकर यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर हे तीन आसनी आहे. सुरुवातीला रविवारीच ही सेवा असेल. त्याच्या बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला असून, आॅक्टोबर महिन्यातील सगळ्या फेऱ्या बुक झाल्या आहेत. सध्या उत्तर मुंबईतील पर्यटन स्थळांचे दर्शन घडेल. त्यानंतर दक्षिण मुंबईतील पर्यटनस्थळांचेही हेलिकॉप्टरमधून दर्शन घडवण्याचे नियोजन आहे.