Join us  

हेलिकॉप्टरमधून मुंबई दर्शन

By admin | Published: July 09, 2015 1:54 AM

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आता मुंबईचे दर्शन हेलिकॉप्टरमधून घडविण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) घेतला आहे.

मुंबई : मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना आता मुंबईचे दर्शन हेलिकॉप्टरमधून घडविण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) घेतला आहे. यासाठी आराखडा आखण्यात आला असून त्याचे टेंडरही काढण्यात आल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले. पर्यटकांना मुंबई ते नरिमन पॉइंट आणि मुंबई ते ठाणे असा हवाई सफरीचा आनंद घेता येईल. ही योजना पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलवर राबवण्यात येणार आहे. मुंबईचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. या हवाई पर्यटन सफरीच्या निमित्ताने या पर्यटकांना मुंबईचे विहंगम दृश्य पाहायला मिळणार आहे. या हवाई मुंबई दर्शनात जुहू ते नरिमन पॉइंट आणि जुहू ते ठाणे असे दर्शन घडेल. यासाठी दोन वेगळ्या फेऱ्या नियोजण्यात आल्या आहेत. यासाठी पर्यटकांना अर्धा तास आणि एक तास असे दोन पर्याय देण्यात येणार असल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले. या मुंबई दर्शनाबरोबरच हवाई सफरीचे आणखी काही प्रस्ताव आखण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई ते एलिफंटा, मुंबई ते अजंठा, मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते नाशिक-त्र्यंबकेश्वर यांचा समावेश आहे. सध्या मुंबई ते नरिमन पॉइंट आणि ठाणे या सेवा सुरू करण्याचा विचार असून सप्टेंबर महिन्यापर्यंत ती पर्यटकांसाठी कार्यान्वित करण्याचा विचार असल्याचे सांगण्यात आले.(प्रतिनिधी)पर्यटनस्थळांची सफर> अर्धा किंवा एक तासासाठी हेलिकॉप्टरमधून मुंबई आणि त्याच्या परिसराचे दर्शन घडविले जाईल. यात फिल्मसिटी, एस्सेल वर्ल्ड, पॅगोडा, हाजी अली, सी-लिंक, कान्हेरी केव्हस, गेट वे आॅफ इंडिया यासह अन्य ठिकाणांचे हवाई दर्शन घडविले जाईल. > एलिफंटा, अजंठा, शिर्डी, नाशिकसाठी प्रस्तावित असलेले हवाई दर्शन दोन प्रकारे असेल. पर्यटक हेलिकॉप्टरमधून एकाच दिशेने प्रवास करू शकतील आणि त्यानुसारच शुल्क आकारले जाईल. साधारण एक तास या ठिकाणांचे हवाई दर्शन पर्यटकांना घडेल. या योजनेला हेलि-टूरिझम असे नाव देण्यात आले आहे. यामुळे पर्यटकांना मुंबईचे दर्शन हेलिकॉप्टरमधूनही घेता येईल. लवकरच ही योजना आणली जाईल. - संजय ढेकणे, वरिष्ठ व्यवस्थापक-प्रसिद्धी आणि जनसंपर्क, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळपीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) मॉडेलनुसार ही योजना राबवण्यात येणार आहे. या हवाई दर्शनाचे शुल्क मात्र अद्याप ठरलेले नाही. एखाद्या कंपनीला निविदा प्रक्रियेनुसार काम मिळाल्यानंतर त्यांनी आखून दिलेल्या शुल्कानुसारच आकारणी होईल. मात्र हे शुल्क पर्यटकांना परवडण्यासारखे आहे का हे तपासूनच त्याची अंमलबजावणी करायची की नाही याचा विचार केला जाईल, अशी माहिती देण्यात आली.