मुंबई - देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले असून रिपब्लिकन पक्षही त्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपैकी 4 राज्यांत म्हणजे पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल आणि केरळ या 4 राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षाला निवडणूक आयोगाने कप-बशी हे निवडणूक चिन्ह दिले आहे.
निवडणूक आयोगाने 4 राज्यांत रिपब्लिकन पक्षाला एक निश्चित चिन्ह दिले असल्यामुळे या चारही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत चांगला प्रचार करून यश मिळविता येईल असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. तसेच आगामी 5 राज्यांपैकी तामिळनाडू या एका राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पक्षाला हेलिकॉप्टर हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तामिळनाडूतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना एक निवडणूक चिन्ह मिळाल्याने तामिळनाडूत ही रिपब्लिकन पक्ष चांगली कामगिरी करेल असाही विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
देशातील 5 राज्यात पुढील काही महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यापैकी, पश्चिम बंगाल आणि केरळमधील निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले आहे. पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या 5 राज्यांत निवडणुका पार पडणार आहेत. भाजपाने त्या दृष्टीने तयारी केली असून प्रचारसंभांचा धडाका सुरु आहे.