Join us

5G ची नांदी! हॅलो, ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चा जमाना येतोय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 6:44 AM

आता वस्तूंमध्ये एक इलेक्ट्रॉनिक चीप बसवली की सारी कामे ‘ऑटोमेटिक’ होतील. ‘फाइव्ह जी’मुळे दूरसंचार यंत्रणेत दाखल होणारे हे क्रांतिकारी बदल आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान, दळणवळण यांसह दैनंदिन जीवनातील असंख्य घटकांना व्यापून टाकणार आहेत.

संदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाहने एकमेकांच्या आणि रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणेच्या संपर्कात राहून अपघातांवर नियंत्रण मिळवतील. मशिन्स आपापसात ताळमेळ साधून उत्पादन प्रक्रिया पार पाडतील. फोन डायल किंवा डॉक्यूमेंट डाऊनलोड करायला मानवी हस्तक्षेपाची गरज नसेल. आॅनलाइन गेम्समधला रिस्पॉन्स टाइम कमी झाल्याने त्यातला थरार वाढेल. कारण हॅलो, ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’चा जमाना येत आहे.

आता वस्तूंमध्ये एक इलेक्ट्रॉनिक चीप बसवली की सारी कामे ‘ऑटोमेटिक’ होतील. ‘फाइव्ह जी’मुळे दूरसंचार यंत्रणेत दाखल होणारे हे क्रांतिकारी बदल आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान, दळणवळण यांसह दैनंदिन जीवनातील असंख्य घटकांना व्यापून टाकणार आहेत. ३१ जुलै १९९५ रोजी मोबाइलचे तंत्रज्ञान भारतात दाखल झाले. तेव्हा एका मिनिटाच्या कॉलसाठी १६.८० रुपये मोजावे लागत होते. आता व्हॉइस कॉल जवळपास विनामूल्य झाले आहेत. चीनपाठोपाठ सर्वाधिक मोबाइल ग्राहक भारतात आहेत. या लक्षणीय प्रवासाला आज २५ वर्षे पूर्ण होत असून यापुढील दूरसंचार क्षेत्रातील वाटचाल अधिक आश्चर्यकारक असेल, अशी माहिती इंडियन इन्स्टिट्यूट आॅफटेक्नॉलॉजीचे संचालक अभय करंदीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘टू जी’मध्ये फक्त संभाषण शक्य होते. ‘थ्री जी’मध्ये डेटा दाखल झाला, मात्र त्याचा वेग अत्यंत कमी होता. ‘फोर जी’ दाखल झाल्यानंतर केवळ वेगच वाढला नाही तर आपले संभाषणही डेटाच्या माध्यमातून सुरू झाले. परंतु, हे तंत्रज्ञान फोन, टॅब आदींपर्यंतच मर्यादित होते. ‘फाइव्ह जी’मध्ये इंटरनेटचा डाऊनलोड स्पीड १० पटीने वाढणार असून मशिन टू मशिन संपर्क यंत्रणा स्थापन करणे शक्य होणार आहे. त्या परिस्थितीत असंख्य कामांसाठी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरजच शिल्लक राहणार नाही. ‘इंटरनेट आॅफ थिंग्स’चे हे युग असेल. दैनंदिन जीवनातले अनेक घटक या यंत्रणेच्या माध्यमातून जोडले जाणे शक्य होईल. त्यानंतर येणाऱ्या ‘सिक्स जी’ टेक्नॉलॉजीमुळे आपण डिजिटल वर्ल्डमध्ये प्रवेश करू, असे करंदीकर यांनी सांगितले. इंटरनेट दाखल झाल्यानंतर कोणत्या नावीन्यपूर्ण गोष्टी (इनोव्हेशन) येतील याची कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे फाइव्ह आणि सिक्स जी तंत्रज्ञान कोणकोणत्या नव्या संकल्पना आणि बदलांना जन्म देते हे येणारा काळच ठरवेल, असेही त्यांनी सांगितले.

नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील१९८९ साली संगणक दाखल झाल्यानंतर लाखो नोकºया जातील, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र, ती निरर्थक ठरली. त्याच धर्तीवर ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानामुळे रोजगार कमी होतील, ही भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र, तो धोका टाळायचा असेल असेल तर बदलत्या परिस्थितीनुसार नवनवी कौशल्य आत्मसात करावी लागतील, असे करंदीकर यांनी स्पष्ट केले.

सुरक्षेचा धोका अपरिहार्यतंत्रज्ञानाच्या या अनिर्बंध शिरकावामुळे वैयक्तिक पातळीवर सायबर सुरक्षेचे अनेक मुद्दे उपस्थित होतील. ते अपरिहार्य आहेत. मात्र, नवे तंत्रज्ञान विकसित करताना रिस्क मॅनेजमेंटवर निश्चितच भर दिला जाईल. तसेच, वैयक्तिक पातळीवरही सुरक्षेबाबत प्रत्येकालाच अधिक सजग व्हावे लागणार आहे.

पहिला कॉल कोलकाता ते दिल्लीदरम्यानदेशात मोबाइलद्वारे पहिला कॉल कोलकाता ते दिल्लीदरम्यान करण्यात आला. कोलकाता येथील रॉयटर्स इमारतीमधून ज्योती बसू यांनी नवी दिल्लीतील संचार भवनात असलेल्या सुखराम यांना तो केला होता. मोदी टेल्स्ट्रा नामक कंपनीच्या मोबाइल नेट सेवेद्वारे हा कॉल करण्यात आला होता.

टॅग्स :इंटरनेट