हॅलो लीड : गुजराती मते निर्णायक

By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:34+5:302017-01-23T20:13:34+5:30

हॅलो लीड : गुजराती मते निर्णायक

Hello Lead: Breakthrough by Gujarati votes | हॅलो लीड : गुजराती मते निर्णायक

हॅलो लीड : गुजराती मते निर्णायक

Next
लो लीड : गुजराती मते निर्णायक
मनोहर कुंभेजकर / मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युतीची अजून अनिश्चितता आहे. जर युती झाली नाही तर मुंबई महानगर पालिकेच्या २२७ जागांपैकी गुजराती नागरिकांचे प्राबल्य असलेल्या सुमारे २५ प्रभागांतील गुजराती मतांची व्होट बँक शिवसेनेसाठी निर्णायक ठरू शकते. शिवसेनेकडे मोठया प्रमाणत गुजराती समाज येत असून त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढल्याची चर्चा आहे.
१५ डिसेंबरला सेनाभवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बृहन्मुंबई गुजराथी समाजाचे अध्यक्ष हेमराज शहा यांना शिवबधन बांधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला. यावेळी काँग्रेसच्या मुंबई विभागाचे गुजराथी सेलचे अध्यक्ष भरत दनानी यांच्यासह २५० गुजराती समाज बांधवांनी सेनेत प्रवेश केला. हेमराज शहा यांना मानणारा मोठा गुजराथी वर्ग आहे. मुंबईत मराठी मतदार आता २२ टक्के राहिला असून एकटया मराठी मतांच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार नाहीत. त्यामुळे शिवसेनेने गुजराती, उत्तर भारतीय आणि अन्य धर्मांच्या मतदारांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. तर गुजराती समाजातील १० जणांचा संच तयार करण्यात आला असून ते गुजराती बांधवांच्या घरोघरी जात शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे गुजराती बांधवांच्या संपर्कात शिवसेना असल्याची माहिती हेमराज शहा यांनी दिली.
शिवसेना आणि गुजराती बांधवांचे नाते हे शिवसेनाप्रमुखांपासून आहे. १९९२-९३ च्या दंगलीत शिवसेनेने गुजराती बांधवांचे रक्षण केले होते. याची जाणीव मुंबईतील गुजराथी बांधवांना आहे. केंद्र सरकारने जवाहिर व्यापार्‍यांवर लावलेला १ टक्का कर आणि नंतर नोटा बंदीमुळे लागलेली त्यांच्या उद्योगात आलेली मंदी, वाढती बेकारी यामुळे गुजराती बांधव मोदी सरकारवर नाराज आहे. शिवसेनेकडून गुजराती बांधवांना न्याय मिळेल; त्यामुळे गुजरात्ती समाज, व्यापारी वर्ग शिवसेनेत मोठया संख्येने सामील होत आहे, असे हेमराज शहा यांनी सांगितले. विशेष म्हणजे भाजपा, काँग्रेससह उर्वरित पक्षांचे नगरसेवक आणि गुजराती बांधवही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
.............................................
२५ प्रभागांत गुजराती मतदारांचे प्राबल्य
मुंबईतील २५ प्रभागांमध्ये गुजराती मतदारांचे प्राबल्य आहे. यामध्ये दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, विलेपार्ले, वडाळा, किंगसर्कल, घाटकोपर, मुलुंड, मुंबादेवी, काळबादेवी, झवेरी बाजार, मलबार हिल, कुलाबा या भागात सुमारे २२ लाख गुजराती मतदार आहेत.
.............................................
राजूल पटेल होणार सक्रिय
शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि महिला विभागसंघटक राजूल पटेल यांचा विभाग यंदा खुला झाल्यामुळे त्या प्रभाग क्रमांक ६१ मधून इच्छूक आहेत. यापूर्वी त्या १९९२ ते २०१२ पर्यंत लोखंडवाला-बेहराम बाग येथे शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. गत पालिका निवडणुकीत गुजराती मतांचे प्राबल्य असलेल्या लोखंडवाला येथील प्रभाग क्रमांक ५५ येथील मतदार संघात त्यांचा कमी मतांनी पराभव झाला होता.
.............................................
गुजराती उमेदवारांची चाचपणी
गेल्या टर्ममध्ये शिवसेनेच्या पालिकेत गुजराती समाजाच्या बोरिवली येथील हंसाबेन देसाई या एकमेव नगरसेविका होत्या. मात्र यंदा गुजराती मतदारांचे प्राबल्य असलेल्या मतदार संघात यंदा शिवसेनेतर्फे गुजराती उमेदवारांची चाचपणी करण्यात आली असून यंदा त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत शिसवेना-भाजपा यांच्यामध्ये गुजराती समाजाच्या एक गठ्ठा मतांसाठी चुरस वाढणार आहे.
............................................
गुजराती बांधवांचा पक्षप्रवेश
गोरेगाव ते दहिसर येथील नुकताच २५० गुजराती बांधवांनी तर मालाड येथील १०० गुजराती बांधवांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे गुजराती बांधवाची मोठी ताकद शिवसनेच्या पाठीमागे उभी असल्याचे चित्र सध्या तरी आहे.
............................................
फायदा होणार का?
शिवसेनेच्या व्यापारी विभागाचे बिरेन लिबांचिया, मालाडचे माजी नगरसेवक अशोक पटेल हे गुजराती समजात सक्रीय असून त्यांचा फायदा शिवसेनेला पालिका निवडणुकीत होणार असल्याची चर्चा आहे.
............................................
राज्यातील गुजराथी बांधवांसाठी अंधेरी (पश्चिम), लोटस पेट्रोल पंपासमोर, आदर्श नगर येथे सुसज्ज १८ खोल्या, सभागृह, हेल्थ सेंटर असलेले गुजराथी भवन हेमराज शहा यांनी बांधले असून येत्या ७ एप्रिलला या भवनाचे उद्घाटन होणार आहे. गुजराती मते खेचण्यासाठी शिवसेनेकडून या मुद्याचा वापर होऊ शकतो.

Web Title: Hello Lead: Breakthrough by Gujarati votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.