Join us

हॅलो लीड....ऑक्टोबर घाम काढणार!

By admin | Published: September 30, 2014 9:38 PM

हॅलो लीड....

हॅलो लीड....
........................................
ऑक्टोबर घाम काढणार!
सचिन लुंगसे
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीने वेग घेतला असतानाच मुंबईतील बहुतेक विधानसभा मतदार संघात पंचरंगी निवडणूक रंगणार आहेत. मात्र या पंचरंगी निवडणूकांमुळे महायुती आणि आघाडीचे कार्यकर्ते राजकीय पक्षांमध्ये विभागले गेले आहेत. कार्यकर्त्यांचीही वानावा आहे. आणि त्यातच ऑक्टोबर हिटने गदारोळ माजविल्याने संपूर्ण महिन्यातील कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३६ अशांदरम्यान राहणार असल्याने राजकीय रणधुमाळीदरम्यान मुंबईकरांचा चांगलाच घाम निघणार आहे.
पावसाळा संपून हिवाळ्याचा सुरु होण्याचा हा कालखंड असल्याने या काळात ऋतूचक्रात बदल होत असतात. त्यामुळे या काळात सातत्याने वाहणार्‍या वार्‍याची दिशा बदलत असते. मुळात समुद्राहून मुंबईकडे जे दमट वारे वाहतात; त्या वार्‍यामुळे शहराचे तापमान नियंत्रण राहण्यास मदत होत असते. परंतु, वार्‍याच्या दिशा सातत्याने बदलत राहत असल्याने सद्यस्थितीमध्ये आग्नेय दिशेकडून वाहणार्‍या वार्‍याचा प्रभाव अधिक आहे. परिणामी तापमानात वाढ नोंदविण्यात येत असून, मान्सून वार्‍यामुळे हवेतील बाष्प कमी होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. या कारणात्सव पुढील आणखी काही दिवस मुंबईकरांचा घाम निघणार आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, मुळातच परतीचा पाऊस सप्टेंबर महिन्यातच महाराष्ट्रातून काढता पाय घेतो. मात्र यावेळी परतीच्या पावसाचा प्रवास राजस्थानातूनच विलंबाने सुरु झाला आहे. सद्यस्थितीमध्ये परतीच्या पावसाने राजस्थानसह गुजरात राज्याचा काही भाग आणि उत्तरेकडील आणखी काही राज्य काबीज केली आहेत. परतीच्या पावसाचा प्रवास ईशान्यकडील राज्याकडून नंतर महाराष्ट्राच्या दिशेने झाला आहे. आता तो महाराष्ट्रातूनही पुढे सरकेल. परंतु या प्रक्रियेला किमान ऑक्टोबरचा पहिला आठवडा उजाडेल.
सप्टेंबर महिन्याच्या पूर्वार्धात मान्सूनचा जोर राहणे अपेक्षित होते. परंतु सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दडी मारली. सुरुवातीचे दोन ते तीन दिवस वगळता पाऊस शहरासह उपनगरात फारसा काही बरसला नाही. त्यामुळे महिन्याच्या शेवटच्या पंधरा दिवसांत ऊन्हाने डोके वर काढले आणि आता तर कमाल तापमानाचा पारा थेट ३७ अंशावर जाऊन ठेपला. मागील चारएक दिवसांपासून शहराचे कमाल तापमान २८ अंशाहून थेट ३२ अंशावर पोहचले आहे. आणि आता तर कमाल तापमानाचा पारा थेट ३४ व ३७ अंशावर पोहचला असून, ऑक्टोबर महिन्यात सरासरी तापमान ३४ अंशाच्या आसपास राहणार असल्याने विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय गरमागरमी चांगलीच तावून सुलखून निघणार आहे. (प्रतिनिधी)
....................
- २०१२ सालीदेखील ऑक्टोबर सुरु होताच १ ऑक्टोबर रोजी म्हणजे महिन्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शहराच्या कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस एवढा नोंदविण्यात आला होता.
- २०१३ साली ऑक्टोबर महिन्यातील कमाल तापमानाच्या सरासरी पार्‍याने ३६ अंशापर्यंत मजल मारली होती.
- २०१४ सालादरम्यान सप्टेंबर महिन्यात कमाल तापमानाच्या पार्‍याने ३७ अंशापर्यंत मजल मारली आहे.
- सप्टेंबरमधील सर्वाधिक तापमान २३ सप्टेंबर १९७२ रोजी ३६.४ अंश एवढे नोंदविण्यात आले होते.
- ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक तापमान २३ ऑक्टोबर १९७२ रोजी ३७.९ अंश एवढे नोंदविण्यात आले होते.
....................