Join us

हॅलो लीड विथ फोटो : आम्ही पॉझिटिव्ह : मानसोपचार, समुपदेशनामुळे २५ ते ३० टक्के रुग्ण कोरोनातून बाहेर पडण्यास मदत झाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 4:07 AM

सचिन लुंगसेलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतल्या कोविड केंद्रात, विशेषत: जेथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत तेथे गेल्या ...

सचिन लुंगसे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतल्या कोविड केंद्रात, विशेषत: जेथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत तेथे गेल्या वर्षभरात म्हणजे कोरोना काळात समुपदेशकांनी मोलाची भूमिका बजावली आहे. कारण कोरोना रुग्णांना मानसिक आधार देण्यासह समुपदेशन दिल्याने किमान २५ ते ३० टक्के कोरोनातून बाहेर पडण्यास मदत झाली, असा दावा मुंबईतल्या कोविड केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे. दरम्यान, हे करतानाच औषधोपचार तेवढेच महत्त्वाचे आहेत, असेदेखील तज्ज्ञांनी नमूद केले.

मुंबईला एक वर्षांपूर्वी कोरोनाचा विळखा पडला. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कमी अधिक प्रमाणात आढळत असलेले रुग्ण जुलै महिन्यात आणखी वाढू लागले. तेव्हा रुग्णांचा पॉझिटिव्ह दर १० ते १२ टक्के होता. याच काळात मुंबईत ठिकठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर सुरू करण्यात आले. अशाच एका म्हणजे मुलुंड जम्बो कोविड सेंटरच्या अधिष्ठातापदी कार्यरत असलेले डॉ. प्रदीप आंग्रे यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, सुरुवातीला येथे १६५० बेड आणि २० ऑक्सिजन बेडची सुविधा होती. जून महिन्यात येथे काम सुरु केले, तेव्हा रुग्णसंख्या झपाटयाने वाढत होती. नोव्हेंबरपर्यंत रुग्णसंख्या वाढतच होती. नंतर रुग्णसंख्या कमी झाली. मात्र, सुरुवातीला लोकांच्या मनात कोरोनाबाबत भीती होती. आम्ही काम करायला गेलो आणि आम्हाला लागण झाली तर अशी काहीशी भीती लोक बाळगून होते. मनुष्यबळ उपलब्ध होत नव्हते. परंतु आम्ही आहे त्या मनुष्यबळात काम केले आणि कोरोना रुग्णांवर यशस्वी उपचार केले. आता कोरोनाची तिसरी लाट थोपवायची असेल तर प्रत्येकाने नियम पाळणे गरजचे आहे, असेदेखील डॉ. प्रदीप आंग्रे यांनी सांगितले.

-----------

वेलकम किट

कोरोना केंद्रात रुग्ण दहा दिवस राहतो. दाखल होते वेळी त्याला वेलकम किट दिले जाते. कोलगेट, टुथब्रश, साबण, टॉवेल, दोन मास्क, पाण्याची बाटली प्रत्येक रुग्णाला दिली जाते. याव्यतिरिक्त दोन वेळचे जेवण आणि नाष्टा मोफत दिला जातो. प्रत्येक रुग्णाचे समुपदेशन केले जाते. शिवाय इन हाऊस गेम खेळण्यास दिले जातात. वर्तमानपत्र वाचण्यासाठी दिली जातात. फळे सेवनासाठी दिली जातात.

-----------

रुग्ण वाढीचा आलेख घसरला

गेल्या तीन महिन्यात दुसऱ्या लाटेत मुलुंड कोविड सेंटर दिवसाला १२० ते १७५ रुग्ण दाखल होत होते. एक वेळ अशी होती की, १२८० रुग्ण दाखल होते. येथील क्षमता १६०० आहे. तेव्हा रुग्णवाढीचा दर २० टक्के होता. आता हा दर ८ टक्के आहे. येथे ११ हजार रुग्णांना बरे करून पाठविण्यात आले आहे.

-----------

ऑक्सिजनबॉय आणि कोविड सेंटर

मुलुंडमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी १३ हजार लीटरचे दोन टँक आहेत. हे संपले तरी ३ तासांचा बॅक अप राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सिजनबॉय तीन पाळ्यात ठेवण्यात आला आहे. याबाबत सगळे काम तो करत आहे.

-----------

तिसरी लाट आणि लहान मुले

कोरोनाची तिसरी लाट जून महिन्याच्या शेवटी येईल. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक बाधा होईल, अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने तयारीदेखील सुरु झाली आहे. जेणेकरून रुग्णसंख्या वाढली तर वेळेत आरोग्य सेवा देता येतील.

-----------

मुख्यमंत्री आणि आयुक्त

मुंबईमधील कोरोना रुग्ण वाढीचा दर कमी होण्याचे बहुतांश श्रेय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना आहे. कारण त्यांनी ज्या पध्दतीने समन्वय साधला, त्यामुळे कोरोनाला आळा बसतो आहे. आजही ऑक्सिजनचे नियोजन करण्यासह उर्वरित घटकांसाठी ज्या पध्दतीने काम होते आहे, त्यामुळे कोरोनाचे उच्चाटन होत असल्याचे कोविड केंद्राकडून सांगण्यात आले.