हॅलो पवारसाहेब, आम्ही हाय तुमच्यामागे; आंबेगावातून थेट व्हिडिओ कॉलद्वारे संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 02:07 PM2023-07-08T14:07:44+5:302023-07-08T14:33:20+5:30
काय म्हणतंय आंबेगाव तालुका? असा सवाल शरद पवारांनी केला. त्यावर, ताराबाई यांनी शरद पवारांशी संवाद साधला.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काका विरुद्ध पुतण्या असे दोन गट पडले असून शरद पवार यांनी पुतण्याच्या म्हणजेच अजित पवारांच्या बंडानंतर आक्रमक पवित्रा घेत थेट जनतेत जाऊन लढा द्यायला सुरुवात केली आहे. त्याच, पार्श्वभूमीवर आता पहिली सभा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात होत असून इथूनच राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला नारळ फुटणार आहे. पक्ष सोडून गेलेल्या छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यातच पवारांची ही पहिली सभा असल्याने या सभेला कसा प्रतिसाद मिळणार, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. दरम्यान, येवला मार्गावर निघालेल्या शरद पवार यांनी आंबेगाव तालुक्यातील महिलेशी फोनवरुन संवाद साधला.
काय म्हणतंय आंबेगाव तालुका? असा सवाल शरद पवारांनी केला. त्यावर, ताराबाई यांनी शरद पवारांशी संवाद साधला. हॅलो पवारसाहेब, आम्ही आहे तुमच्या पाठीमागे, गेला तर जाऊ द्या पाटील. आम्ही कायम तुमच्यासोबत आहे. आमची अनिता शिकायला होती ना बारामतीला, चांगलं शिक्षण दिलं, चांगलं झालं, सभापती झाली. आता, चांगल्या कामाला लागली नोकरीला, असे म्हणत आंबेगाव तालुक्यातील ताराबाई हरिभाऊ निघोट यांनी थेट शरद पवार यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला.
ताराबाईंसोबत पवार साहेबांची ही बातचीत ऊर्जा देणारी आहे, असे म्हणत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ह्या कॉलचा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. हा मातामाऊलींचा विश्वास आदरणीय शरद पवार साहेबांवर.. “ आता आणखी ठणठणीत झालोय” हे साहेबांचं वाक्य अनेकांना उमेद देणारं आहे! उमेद संघर्षाची, तत्वांसाठी लढण्याची, असे ट्विटही खासदार कोल्हे यांनी यावेळी केलं आहे.
हा मातामाऊलींचा विश्वास आदरणीय शरद पवार साहेबांवर.. “ आता आणखी ठणठणीत झालोय” हे साहेबांचं वाक्य अनेकांना उमेद देणारं आहे! उमेद संघर्षाची, तत्वांसाठी लढण्याची!
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 8, 2023
आंबेगाव तालुक्यातील ताराबाई हरिभाऊ निघोट यांच्यासोबत पवार साहेबांची ही बातचीत ऊर्जा देणारी आहे.#लढायचंय_जिंकायचय… pic.twitter.com/2lHGMiRqnf
शनिवारी सकाळी ८ वाजता सिल्व्हर ओक या निवासस्थानावरून शरद पवार नाशिकच्या दिशेने निघाले आहेत. रस्त्यात ठाणे, भिवंडी, पडगा, शहापूर, इगतपुरी या मार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करताना दिसून येत आहेत. नाशिकच्या सभेनंतर पवार धुळे आणि जळगावचा दौरा करणार आहेत. मात्र, पावसाचा अंदाज घेऊन हा दौरा लवकरच जाहीर केला जाणार आहे. दरम्यान, शरद पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे आहेत. खासदार कोल्हे यांनीच आंबेगावातील ताराबाई निघोट यांना फोन करुन, ग्रामीण भागात शरद पवारांप्रती असलेल्या प्रेमाची साक्ष दिली.
येवला येथील बाजार समितीच्या बंदिस्त शेडमध्ये सभेसाठी व्यासपीठ उभारणी करण्यात आली आहे. १५० बाय २०० फूट आकार असलेल्या या शेडमध्ये चार फूट उंचीचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. पत्र्याचे शेड असल्याने पावसातही सभा घेता येणार आहे. ५ हजार लोक बसू शकतील अशी सोय करण्यात आली आहे. भुजबळ यांचे कट्टर विरोधक ॲड. माणिकराव शिंदे यांनी या सभेच्या नियाेजनासाठी पुढाकार घेतला आहे.