मुंबई : तो लोकलची वाट पाहात उभा होता आणि अचानक त्याची नजर रूळांवर पडली. तेथे एक व्यक्ती जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तेवढ्यात त्याच ट्रॅकवरून एक लोकल येत असल्याचं त्यानं पाहिलं. स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा न करता येणा-या धडधडत्या लोकलला थांबवण्यासाठी त्याने थेट ट्रॅकवर उडी घेतली आणि त्या जखमी व्यक्तीचे प्राण वाचवले.
हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या चर्नीरोड स्टेशनवर सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. 26 वर्षांचा एमबीएचा विद्यार्थी श्रवण प्रेम तिवारी लोकलची वाट पाहत प्लॅटफॉर्म नंबर 4 वर उभा होता. तेवढ्यात त्याची नजर ट्रॅकवर जखमी अवस्थेत पडलेल्या व्यक्तीवर पडली, क्षणाचाही विचार न करता श्रवणने ट्रॅकवर उडी घेतली. तो व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडल्याचं त्याने पाहिलं, त्याच्या डोक्यातून अन् पायातून रक्ताची धार सुरू होती. त्याचवेळी ट्रॅकवरून येणा-या लोकलला श्रवणने पाहिलं आणि थेट ट्रॅकच्या मधोमध उभं राहून लोकलच्या दिशेने हाताने इशारे करण्यास सुरूवात केली. जोपर्यंत लोकल थांबत नाही तोपर्यंत श्रवण लोकलला इशारे देत थांबला. काय म्हणाला श्रवण -ज्या वेळी मी त्या व्यक्तीला पाहिलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला असावा असं मला वाटलं, पण मी त्याच्या नाकाजवळ बोट ठेवल्यावर त्याचा श्वास सुरू असल्याचं माझ्या लक्षात आलं. मी त्याची मदत करणार त्याचवेळी मरीन लाइन्सहून लोकल स्टेशनच्या दिशेने येत असल्याचं पाहिलं. मला काहीच सुचत नव्हतं, लोकल त्याला चिरडून पुढे निघून जाईल असं मला वाटलं. वेळ वाया न घालवता मी त्या लोकलच्या दिशेने जोपर्यंत लोकल जागेवर थांबत नाही तोपर्यंत इशारे करण्यास सुरूवात केली. अखेर लोकलच्या मोटारमनचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि त्याने त्वरित लोकल थांबवली.
मदतीसाठी मी ओरडत होतो, काही प्रवाशांनी माझा आवाज ऐकला आणि ते देखील मदतीसाठी धावले. त्यांच्या सहाय्याने आम्ही त्या जखमी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि त्याचा जीव वाचला. त्यावेळी स्टेशनवर पोलीसही उपस्थित होते, पण ते मदतीला धावले नाहीत , त्यामुळे जखमी अश्विन सावंतला मदत मिळण्यास उशीर झाला असं श्रवणने सांगितलं.