Join us

‘हॅलो, पालिकेतून बोलतोय, तुमच्या रुग्णालयावरचा बोर्ड अनधिकृत आहे’; डॉक्टरलाच घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 1:16 PM

दंड भरावा लागेल; म्हणत घातला गंडा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रुग्णालयावर असलेला बोर्ड अनधिकृत असून त्यावर तोडक कारवाई करण्याचे सांगत डॉक्टरला सायबर भामट्याने गंडवल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

वांद्रे पश्चिमच्या एस व्ही रोड परिसरात डोळ्यांवरील उपचारासाठीचे खासगी रुग्णालय आहे. पालिका अधिकारी हे रुग्णालयावर असलेल्या लॉलीपॉप बोर्डावर तोडक कारवाई करण्यासाठी येणार असल्याचे संबंधित महिला डॉक्टरच्या दिराने फोन करून सांगितले.  

त्यानुसार ५४ वर्षीय महिला डॉक्टरने दिराकडून कॉलरचा नंबर घेत संपर्क साधला. तेव्हा फोन उचलणाऱ्याने स्वतःला पालिका अधिकारी महाजन म्हणवत बोर्डाच्या तोडक कारवाईसोबत दंड म्हणून तुम्हाला २९ हजार ५०० रुपयेही भरावे लागतील, असे सांगितले. त्यावर संबंधित बोर्डाला ट्यूबलाइट लावलेला नसल्याने त्याला पालिकेची परवानगी लागत नाही असे उत्तर डॉक्टरने महाजनला दिले. त्यावर तो नियम २०१३ पूर्वीचा असेल त्यामुळे तुम्हाला सदर दंड आकारण्यात आलेला आहे आणि परवानगीसाठी तुम्ही अर्ज करणे गरजेचे होते, असेही सांगितले. तुम्ही आताही अर्ज करू शकता. सध्या पालिकेचे सर्व्हर डाउन असल्याने मी ते बॅक डेटमध्ये दाखवू शकतो असे महाजन त्यांना म्हणाला. महिला डॉक्टरने याबाबत पतीशी चर्चा करून प्रक्रिया करण्यास सांगितली आणि महाजनच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी आधार कार्ड, रुग्णालय रजिस्ट्रेशन, ई-मेल आयडी आणि फोन नंबर त्याला व्हाॅट्सॲप केला.

- रुग्णालयाच्या व्यवस्थापकाने सदर बोर्डासाठी पालिकेची परवानगी लागत नसल्याचे सांगून एकदा खात्री करून घेतो असे डॉक्टरला सांगितले. 

- मात्र, रात्र झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांशी व्यवस्थापकाचा संपर्क होऊ शकला नाही. अखेर महाजनने अर्ज करून पैसे भरा असे सांगितले, अन्यथा मी तोडक कारवाई करतो अशी धमकी दिली.

- अखेर त्याने निरज नावाच्या व्यक्तीकडून डॉक्टरांना फोन करवत २५ हजार २०० रुपये पाठवायला सांगितले. डॉक्टरांनी पैसे पाठवल्यानंतर मी तुम्हाला गुरुवारी येऊन भेटतो असे महाजन म्हणाला. 

- मात्र, तो अद्याप आला नाही. रुग्णालय व्यवस्थापकाने वांद्रे पश्चिम येथील पालिकेच्या एच पश्चिम या ठिकाणी जाऊन चौकशी केली. तेव्हा सदर नावाची व्यक्ती याठिकाणी कार्यरत नसून महाजनने डॉक्टरांना पाठवलेला ॲप्लिकेशन क्रमांकदेखील फसवा असल्याचे उघड झाले.

 

टॅग्स :गुन्हेगारी