मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले असून, अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. कालच्या एका दिवसात मुंबईमध्ये ऑगस्ट महिन्यातल्या आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबईच्या नालेसफाईवरून राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या फडणवीसांनी मुंबई महापालिकेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. मुंबईमध्ये ११३ टक्के नालेसफाई झाली का हातसफाई झाली? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसंच ज्या गतीने पम्पिंग स्टेशनची उभारणी करायला हवी तशी झालेली नाही, त्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये पाणी साचल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये महापालिकेने या कामांकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.
दुसरीकडे अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपयांची आर्थिक मदत करा, अशी मागणी भाजपाने राज्य सरकारकडे केली आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईत एक प्रकारचं वादळच आलेलं आहे, असंही भाजपानं म्हटलं आहे. कालपासून आज सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे १६२,३ मिमी, कुलाबा ३३१.०८ मिमी पाउस झाला. कुलाबा येथे काल सायंकाळी १०६ किमी प्रती तास इतका वाऱ्याचा वेग होता, तर इतरत्र हा वेग ७० ते ८० किमी प्रती तास होता. यापूर्वी १० ऑगस्ट १९९८ ला २६१ मिमी पावसाची नोंद झाली होती, त्याचा विक्रम पावसानं आज मोडून काढला. काल मुंबईत झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटनाही घडल्या. काल मस्जिद बंदर येथे दोन उपनगरीय रेल्वेमधून २९० प्रवाशांना रेल्वे पोलीस आणि एनडीआरएफने सुरक्षित बाहेर काढलं. दरवर्षी प्रमाणे केवळ तुंबणारे पाणी अशी परिस्थिती नसून ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्यामुळे या दोन दिवसामध्ये झालेल्या अतिवृष्टीला नैसर्गिक आपत्ती जाहीर करून मुंबईकरांना मदत करा, अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.