भाजपाच्या मदतीला शिवसेना, स्थानिक राजकारणाचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 05:24 AM2020-01-07T05:24:25+5:302020-01-07T05:24:46+5:30

राज्यात होत असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी शिवसेनेने भाजपला साथ दिली.

With the help of BJP, Shiv Sena, the idea of local politics | भाजपाच्या मदतीला शिवसेना, स्थानिक राजकारणाचा विचार

भाजपाच्या मदतीला शिवसेना, स्थानिक राजकारणाचा विचार

Next

मुंबई : राज्यात होत असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत बऱ्याच ठिकाणी शिवसेनेने भाजपला साथ दिली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा महाविकास आघाडीचे सरकार असतानाही शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपच्या पारड्यात मते टाकल्याचे समोर आले आहे.
राज्यात काहीही राजकीय समीकरण असले, तरी शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांनी स्थानिक राजकारणाचा विचार करून भाजपला साथ दिल्याचे दिसते. भाजपशी संबंध तोडून शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले असले, तरी खाली जिल्हा परिषदांमध्ये कोणी भाजपसोबत गेल्यास शिस्तभंगाची वा अन्य कोणतीही कारवाई केली जाईल, असे कोणतेही आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीत असूनही शिवसेनेने खाली भाजपसोबत सत्ता समीकरण जुळविण्याची मोकळीक दिल्याचे दिसून येत आहे.
सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आली. तिथे शिवसेनेच्या तीन सदस्यांनी भाजपला साथ दिली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांच्या जिल्ह्यात शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला. लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सोमवारी शिवसेनेच्या एकमेव सदस्याने भाजपसोबत जाणेच पसंत केले. तेथे भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. वर्धा जिल्हा परिषदेत भाजपचे बहुमत आहे. तेथेही शिवसेनेच्या दोन सदस्यांनी सोमवारच्या निवडणुकीत भाजपला मतदान केले. औरंगाबाद जिल्हा परिषदेत अध्यक्षपद महाविकास आघाडीला मिळाले, पण शिवसेनेचे काही सदस्य फुटून भाजपसोबत गेले. सोलापूर जिल्हा परिषदेत शिवसेनेने भाजप आघाडीला पाठिंबा दिला. कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर जिल्हा परिषदेत भाजपला महाविकास आघाडीने दणका दिला.
>सहा जिल्हा परिषदांमध्ये आज सार्वत्रिक निवडणूक
नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक होत असून, महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि भाजपची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे. एखादा अपवाद वगळता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे गेलेले नाहीत. काही ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी मात्र आहे. अकोला आणि वाशिम जिल्हा परिषदेत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.

Web Title: With the help of BJP, Shiv Sena, the idea of local politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.