सीबीटीसी यंत्रणेमुळे आता रेल्वे प्रवास होणार वेगवान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 06:02 AM2019-03-12T06:02:24+5:302019-03-12T06:02:43+5:30

देशातील पहिली यंत्रणा मुंबईत उभारणार; तासाभरात १८ ऐवजी २४ लोकल फेऱ्या चालविणे शक्य

With the help of the CBT system, the train will now be able to travel faster | सीबीटीसी यंत्रणेमुळे आता रेल्वे प्रवास होणार वेगवान

सीबीटीसी यंत्रणेमुळे आता रेल्वे प्रवास होणार वेगवान

Next

- कुलदीप घायवट 

मुंबई : देशातील पहिली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टीम (सीबीटीसी) यंत्रणा मुंबईतील तिन्ही मार्गांवर उभारण्यात येणार आहे. पाश्चिमात्य देशांतील रेल्वे मार्गांवर ही यंत्रणा सुरू आहे. आता ती मुंबईत उभारण्यात येणार असल्याने मुंबईकरांचा प्रवास वेगवान होईल. शिवाय लोकल फेऱ्या वाढल्याने ट्रेनमधील गर्दी कमी होण्यासही मदत होईल.

मुंबई उपनगरीय पश्चिम रेल्वे मार्गावर दर ३ ते ४ मिनिटांना एक लोकल फेरी चालविण्यात येते. सीबीटीसी यंत्रणेत दर २ मिनिटांनी एक लोकल फेरी चालविण्याची क्षमता आहे. तसेच मध्य आणि हार्बर मार्गावर सध्या दर ४ ते ६ मिनिटांनी एक लोकल फेरी चालविण्यात येते. सीबीटीसी यंत्रणेमुळे दर २ ते अडीच मिनिटांनी एक लोकल फेरी चालविणे शक्य आहे. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर एका तासात सरासरी २४ लोकल फेºया चालविणे शक्य होईल. सध्या एका तासात सरासरी १७ ते १८ लोकल फेºया चालविण्यात येतात.

मुंबई रेल्वे विकास महामंडळांतर्गत (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा ३ अ (एमयूटीपी ३ अ) मधील सीबीटीसीला मान्यता मिळाली आहे. या यंत्रणेमुळे हार्बर, मध्य, पश्चिम मार्गावरील लोकल वेगाने धावतील, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांना आहे. सीबीटीसी यंत्रणा आधुनिक असल्याने या प्रणालीत दर ९० सेकंदाला एक लोकल फेरी होण्याची ताकद आहे. मात्र मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर दर २ मिनिटांनी एक लोकल चालविली, तरी लोकलमधील गर्दीचा ताण विभाजित होऊन मुंबईकरांना कमी गर्दीचा, वेगवान प्रवास करता येईल, अशी माहिती एमआरव्हीसीच्या अधिकाºयांनी दिली.

सध्या फक्त मेट्रोमध्ये ही यंत्रणा लागू आहे. मेट्रोचे काम सुरू असताना सीबीटीसी यंत्रणा बसविण्यात आली आहे. रेल्वे रूळ आणि प्रत्येक लोकलमध्ये ही यंत्रणा बसविणे आव्हानात्मक आहे. मात्र मुंबईकरांच्या सेवेसाठी ही यंत्रणा बसविली जाणार आहे, असे अधिकाºयांनी सांगितले.

सीबीटीसी म्हणजे काय?
सीबीटीसी ही आधुनिक सिग्नल यंत्रणा आहे. यामुळे वाहतूककोंडी, दोन ट्रेनमधील अंतर कमी करण्यास मदत होईल. सीबीटीसी लोकल, मालगाडी, मेल, एक्स्प्रेसच्या दरम्यान दूरसंचारचे काम करेल. यात ट्रेनच्या डब्याला आणि रेल्वे रुळावर चीप बसविण्यात येतात. त्यामुळे पारंपरिक एकाच ठिकाणी असलेल्या सिग्नल यंत्रणेला छेद देऊन सीबीटीसी यंत्रणेमुळे ट्रेनचे अचूक ठिकाण आणि पुढील ट्रेनमधील अंतर किती आहे, हे अचूकपणे समजते.

सीबीटीसी प्रकल्प सर्वात आधी हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर राबविण्यात येईल. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते पनवेल या ४९ किमी लांबीच्या रेल्वे मार्गासाठी १ हजार ३९१ कोटी रुपये, मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण एकूण ५३ किमी लांबीच्या मार्गासाठी २ हजार १६६ कोटी तर, पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट-विरार अशा एकूण ६० किमी लांबीच्या मार्गासाठी २ हजार ३७१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

Web Title: With the help of the CBT system, the train will now be able to travel faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.