मुंबई: मालाड तसेच गोरेगाव परिसरातील सराईत सोनसाखळी चोराला अटक करण्यात दिंडोशी पोलिसांना यश आले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा गाशा गुंडाळण्यात आला.
अरबाज अतर असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव असून तो अंधेरीच्या चकाला परिसरातील रहिवासी आहे. तो एक मोटरसायकलचा वापर करत ही चोरी करत होता जी तिसऱ्याच व्यक्तीची होती. गोरेगाव पूर्व व मालाड पश्चिम परिसरात त्याने ४ सोनसाखळी चोरी करुन पळ काढला. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळीचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले. पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांच्या पथकाने मोटरसायकलच्या मालकाला फोन केला तेव्हा तो गावी असल्याचे त्यांना समजले. तसेच त्याने गाडी त्याच्या एका मित्राकडे दिल्याचीही माहिती त्यांना मिळाली. तेव्हा त्या मित्राच्या घरी पोलीस पोहोचले. जो आरे आणि एमआयडीसी पोलिसात खंडणी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारागृहात होता. पोलिसांनी या आरोपीची चौकशी केली. तेव्हा त्याने गाडी अरबाजला दिल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.