वाढीव वीज बिलाचा प्रश्न सोडविण्यासाठी सोसाट्यांमध्ये मदत कक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 04:32 PM2020-09-09T16:32:14+5:302020-09-09T16:32:37+5:30
ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून वीज बिलाबाबत माहिती देत आहेत.
मुंबई : महावितरणचे अधिकारी, मोठ-मोठया सोसायटीमध्ये वीज ग्राहकांसाठी मदत कक्ष स्थापन करून तेथील ग्राहकांशी प्रत्यक्ष संवाद साधून वीज बिलाबाबत माहिती देत आहेत. आणि वीज बिल भरणा करण्यासाठी विनंती करत आहेत. तसेच, व्हाट्स अप ग्रुप बनवून ग्राहक प्रतिनिधींशी संवाद साधत मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा वीज बिलाबाबत माहिती देण्यात येत आहे. या विविध माध्यमातून दिलेल्या विश्लेषणावर ग्राहक समाधानी असून, अनेक ग्राहकांनी जुलै व ऑगस्ट महिन्याचे वीज बिल भरले आहे, असा दावा महावितरणने केला आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे, याकाळात महावितरणकडून मीटर रिडींग, वीजबिल वितरण व बिल भरणा केंद्र बंद करण्यात आले होते. या कालावधीमधील एप्रिल व मे सह जून महिन्याचे वीजबिल एकत्रित पाठविण्यात आले होते. तर प्रतिबंधित क्षेत्राच्या मर्यादेमुळे काही ठिकाणी जून महिन्यातही मीटर रिडींग शक्य न झालेल्या ग्राहकांना जुलै महिन्यात मीटर रिडींगनंतर चार महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात आले होते. परंतु, या वीज बिलाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाले होते. वीज बिलाबाबत ग्राहकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी महावितरणने वेबिनार व ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत ग्राहकांनी वापरलेल्या वीजेचे प्रत्यक्ष रिडिंग घेतल्यानंतर जुलै महिन्यात देण्यात आलेले तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल तसेच ऑगस्ट महिन्यात मीटर रीडिंगप्रमाणे आकारलेले वीजबिल अचूक आहे. लॉकडाऊनच्या काळात आजपर्यंत एकाही ग्राहकाचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केलेला नाही, असे महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले.