मुंबई - देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे. काँग्रेस-भाजपा यांच्यामध्ये एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. यातच देशभक्त, हिंदू राष्ट्रवाद असे मुद्दे निवडणुकीत समोर येत असतानाच नितीन गडकरी यांनी यावर भाष्य केलं आहे. मी राष्ट्रवादी आहे हे सगळ्यांना माहीत आहे, आम्ही मागील निवडणुका लढल्या त्यात अनेक आश्वासने दिली, मात्र आम्ही सत्तेच्या काळात काय केलं हे सांगण्याची वेळ आता आली आहे, मी धर्म, जात याआधारे निवडणूक लढवत नाही असं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे.
नितीन गडकरींच्या या विधानाचे अनेक अर्थ राजकीय वर्तुळात काढले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदू दहशतवाद मुद्द्यावर वर्धा येथे काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यामुळे गडकरींचा नेमका रोख कोणत्या दिशेला आहे याची चर्चा सुरु झाली आहे. नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले की, मी जे बोलतो ते करुन दाखवतो. नागपूरात अनेक विकासकामे मी केली आहेत. नागपूरातील रस्ते, मेट्रो यासारखे अनेक विकासकामांना चालना देण्याचे काम मी केले. या निवडणुकीत मी जनतेसाठी कोणकोणती कामे केली ही सांगून प्रचार करणार आहे.
नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी निवडणुकीसाठी उभे आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांच्यासोबत नितीन गडकरी यांची लढत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. काँग्रेसचे माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचा गडकरी यांनी पराभव केला होता.
समझोता एक्सपेस बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असीमानंद यांची न्यायालयाने सुटका केल्यानंतर भाजपाकडून काँग्रेसवर आरोप केले जात आहे. हिंदू दहशतवाद हे काँग्रेसचे पाप आहे. हिंदू समाजाला बदनाम करण्यासाठी हिंदू दहशतवादाचा वापर काँग्रेसने केला. काँग्रेसमुळे हिंदू समाजाची जगात बदनामी झाली त्यामुळे राजकीय स्वार्थासाठी हिंदू लोकांना टार्गेट करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही भाजपाने केली होती. वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याच मुद्द्यावरुन काँग्रेसला टीकेचं लक्ष्य केलं होतं.