मुंबई : मजुरांना त्यांच्या मूळगावी सोडण्यासाठी गेलेल्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांना राज्य शासनाची ५० लाख रुपये मदत मिळण्यापुर्वी एसटी महामंडळाने अपघात सहाय्यता निधीतून १० लाख रुपये तातडीने मदत करावी. मृत कुटुंबात एकमात्र कमावता आधार गेल्याने त्यांच्या घरातील सदस्यास एसटी महामंडळात त्वरित नोकरी देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेच्यावतीने एसटी महामंडळाकडे केली आहे.
नुकताच झारखंड येथे मजुरांना सोडण्यासाठी सोलापूर आगाराच्या बसला यवतमाळ जिल्ह्यात आरणी तालुक्यातील कोळवण गावाजवळ एसटी बसचा गंभीर अपघात होऊन चालक सुनिल शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबियांना राज्य शासनाची ५० लाख रुपये मदत मिळण्यापुर्वी एसटी महामंडळाने अपघात सहाय्यता निधीतून १० लाख रुपये तातडीने मदत करावी. मृत कुटुंबात एकमात्र कमावता आधार गेल्याने त्यांच्या अवलंबितास अनुकंप तत्वावर एसटी महामंडळात त्वरित नोकरी देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
कोरोना काळातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या राज्य शासनाच्या आणि पालिकेच्या मृत कर्मचाऱयांना ५० लाख रुपये विमा कवचाची सुविधा दिल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा देताना अपघात मृत पावलेल्या सुनिल शिंदे यांच्या घरातील सदस्यांना या तरतुदीचा लाभ मिळावा. यासाठी त्यांच्या वारसांना ५० लाखाची रक्कम नुकसान भरपाई पोटी तात्काळ मिळणे गरजेचे आहे. तसेच राज्य शासनाकडून रु ५० लाख नुकसान भरपाई मिळण्यापूर्वी एसटी महामंडळाने १० लाख नुकसान भरपाई अपघात सहाय्यता निधीमधून तात्काळ द्यावी, अशा मागणीचे पत्रक महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक यांना देण्यात आले आहे.----------------------------राज्य शासनाच्या विमा संरक्षण या तरतुदीचा लाभ एसटी कामगारांनाही मिळावी अशी मागणी एसटी कामगार सेनेने ६ एप्रिल २०२० रोजी एसटी महामंडळाकडे केली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये शासकीय निमशासकीय असा भेदभाव न करता या संकटकाळात सेवा देणाऱ्या प्रत्यके कामगारांच्या या सुविधा देण्यात यावीत अशी प्रतिक्रिया रेडकर यांनी दिली आहे.