लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑटो रिक्षातून प्रवास करताना एका विद्यार्थिनीचा ७३ हजार रुपये किमतीचा मोबाईल गहाळ झाला होता. या प्रकरणी तिने बांगूरनगर पोलिसांकडे तक्रार केली आणि त्यांनी इ-चलान मशीनच्या मदतीने अडीच तासांतच तो शोधून दिल्याने तिने त्यांचे आभार मानले.
प्रियदर्शनी राजू मस्कर (वय २२) असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती शुक्रवारी (दि. १९) रिक्षाने मालाडच्या इन्फिनिटी मॉलमध्ये गेली होती. या दरम्यान ७३ हजार रुपये किमतीचा मोबाईल ती रिक्षातच विसरली. शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तिने बांगूरनगर पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शोभा पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तावडे, पोलीस शिपाई भांगरे व घाग यांनी गेटवरील सीसीटीव्ही कॅमेरा तपासला. त्यात त्यांना रिक्षाचा क्रमांक सापडला आणि त्यांनी ताे ई-चलान मशीनवर तपासून रिक्षामालकाचा पत्ता व मोबाईल क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याच्याशी संपर्क साधून त्याच्याकडून हरविलेला मोबाईल हस्तगत करून संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास म्हणजे अवघ्या अडीच तासांत ताे परत केला. त्यासाठी प्रियदर्शनीने पिसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.
...............................