मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना मदत द्या
By admin | Published: March 20, 2017 03:52 AM2017-03-20T03:52:29+5:302017-03-20T03:52:29+5:30
मुंबईतील शाळांमधील सेवेत असताना, मृत झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांची आर्थिक मदतीविना परवड सुरू आहे. सेवेत असताना
मुंबई : मुंबईतील शाळांमधील सेवेत असताना, मृत झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांची आर्थिक मदतीविना परवड सुरू आहे. सेवेत असताना मृत्यू पावल्यानंतर शिक्षकांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत मिळणे अपेक्षित होते. मात्र, निधी नसल्याचे कारण देत अद्यापही मदत मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र शिक्षक परिषदेने पुढाकार घेत, शिक्षकांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे. शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे म्हणाले की, ‘सेवेत असताना मयत झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना विमा संलग्न ठेव योजनेंतर्गत ६० हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. शिक्षण निरीक्षण उत्तर विभागातील २२ प्रकरणे पकडून, मुंबईतील इतर विभागांतील शेकडो प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षकांच्या पश्चात त्यांचे कुटुंबीय या आर्थिक मदतीपासून वंचित राहिले आहेत.’
अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे शिक्षकांच्या कुटुंबीयांना आर्थिक फटका बसत असल्याचा आरोप बोरनारे यांनी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, संबंधित शिक्षक गेल्यानंतर गृहकर्जाचा हफ्ता, मुलांचे शिक्षण असे अनेक प्रश्न कुटुंबीयांसमोर ‘आ’ वासून उभे असतात. मात्र, शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांची परवड होत असल्याचे बोरनारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)