बालनाट्याच्या प्रयोगातून पूरग्रस्तांना करणार मदत, रमेश वारंग यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 04:26 AM2019-08-16T04:26:47+5:302019-08-16T04:27:27+5:30
राज्यातील पूरग्रस्तांसाठी चोहोबाजूंनी मदतीचा ओघ सुरू असताना ‘मी मराठी शाळा बोलतेय’ या बालनाट्यानेही मदतीचा हात पुढे केला आहे.
मुंबई : राज्यातील पूरग्रस्तांसाठी चोहोबाजूंनी मदतीचा ओघ सुरू असताना ‘मी मराठी शाळा बोलतेय’ या बालनाट्यानेही मदतीचा हात पुढे केला आहे. १७ आॅगस्ट रोजी पार्ले येथे होणाऱ्या या बालनाट्याच्या प्रयोगात जमा होणारे एकूण उत्पन्न पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दिले जाणार आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीला मराठी शाळा वाचविण्यासाठी धडपडणा-या चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचाही हातभार लागणार असल्याची प्रतिक्रिया लेखक दिग्दर्शक रमेश वारंग यांनी दिली.
मराठी रंगमंचावर प्रथमच ‘मातृभाषेतून शिकू द्या, मराठी शाळा टिकू द्या’ या टॅगखाली ‘मी मराठी शाळा बोलतेय’ हे बालनाट्य आले आहे. यामध्ये सरकारच्या उदासीनतेमुळे बंद पडत चाललेल्या मराठी शाळांची दयनीय अवस्था मांडण्याबरोबरच मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने बजावलेली कामगिरीही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, बालभारतीच्या निवडक ३० हून अधिक कवितांचे विद्यार्थ्यांसमोर नाट्य, गायन, वाचन, नृत्य स्वरूपात सादरीकरण झाले तर त्यांना दप्तराचे ओझे वाटणारी पुस्तके हलकी वाटू लागतील आणि या नव्या मित्रांशी विद्यार्र्थ्यांची मैत्री जमेल. या उद्देशाने बालरंगभूमीवर काम करणाºया गंधार या संस्थेने बालभारतीच्या पहिली ते दहावीच्या पुस्तकातील कवितांचा बच्चेकंपनीसाठी धमाल रंगमंचीय आविष्कार रंगभूमीवर आणला आहे. याचा पहिला प्रयोग १७ आॅगस्ट रोजी असून यातून जमा होणारा निधीही मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती लेखक प्रशांत डिंगणकर यांनी दिली.
दोन्ही गोष्टी साध्य करणे शक्य
राज्यातील पूरग्रस्त परिस्थितीशी सामना करण्यासाठी जी काही आर्थिक मदत आवश्यक आहे, ती बालनाट्याच्या प्रयोगातूनही जमा झाली तर मराठीचा प्रचार आणि पूरग्रस्तांना मदत दोन्ही होऊ शकेल.
- प्रसाद गोखले, सदस्य, मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत
महिला आयोगाकडून मदतीचा हात
मुंबई : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा सामना करणाºया महिला, वृद्ध यांच्या आरोग्याचा विचार करून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून या जिल्ह्यात १० हजार सॅनिटरी पॅड आणि दोन हजार अॅडल्ट डायपर देण्यात आले आहेत. राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांत जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी शासनाकडून मदतकार्य सुरू आहे. राज्यभरातून अन्नधान्य, कपडे मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यात पोहोचत आहेत.
मात्र आता पूर ओसरल्यानंतर आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीने सॅनिटरी नॅपकिन्स तसेच वृद्धांकरिता अॅडल्ट डायपरची गरज भासू शकते, याचा विचार करूनच मदत स्वरूपात या वस्तू आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था या जिल्ह्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.
प्रशासकीय यंत्रणा युद्धपातळीवर आपले काम करीत असून, मुख्यमंत्री सहायता निधीतूनही लोकांना मदत देण्यात येत आहे. या प्रयत्नांत आयोगही खारीचा वाटा उचलत असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.
महिला प्रवासी संघटनेची पूरग्रस्तांना मदत
मुंबई : रेल्वेच्या महिला प्रवासी संघटनेकडून पूरग्रस्तांना मदत स्वरूपात वस्तू देण्यात आल्या. महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या प्रतिनिधींनी सांगली येथे जाऊन पूरग्रस्तांना कपडे, खाद्यपदार्थ दिले.
सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वत:हून पूरग्रस्तांना मदतकार्य पुरविणे गरजेचे आहे. पूरग्रस्तांच्या जीवनाश्यक गरजेच्या वस्तू मिळत नाहीत. त्यामुळे कपड्यांसह अंतर्वस्त्रे पुरविली पाहिजेत, असे महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी सांगितले.