चहावाल्या मुलास शिक्षणासाठी पोलीस शिपायाने केली मदत, थेट गृहमंत्र्यांनी घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2020 15:00 IST2020-07-24T14:51:21+5:302020-07-24T15:00:24+5:30
मुंबईच्या वरळी येथील पोलीस कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या ओंकार व्हनमारे यांनी दादर (माटुंगा) येथे एका 14 वर्षीय चहाविक्रेत्या मुलाला शैक्षणिक साहित्य घेऊन घेण्यासाठी मदत केली.

चहावाल्या मुलास शिक्षणासाठी पोलीस शिपायाने केली मदत, थेट गृहमंत्र्यांनी घेतली दखल
मुंबई - कोरोनाच्या महामारीत देशातील, राज्यातील आणि मुंबई पोलीस दलाने केलेलं काम आणि दाखवलेलं धैर्य अतुलनीय आहे. याच कालावधी पोलिसांच्या वर्दीतला माणूस अनेक ठिकाणी पाहायला मिळाला. कुण्या आजीला दवाखान्यात घेऊन जाणारा, कुण्या आजोबाला आपला डबा देणारा, कुण्या अनाथावर अत्यंसंस्कार करणारा तर, कुण्या रिक्षावाल्याची अडकलेली रिक्षा रस्त्यावर धावण्यासाठी मदत करणारा पोलीस महाराष्ट्राने जगाने पाहिला. राज्यातील या पोलिसांच्या कार्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सातत्याने कौतुक करत, त्यांना ऊर्जा दिला. आता, आणखी एका मुंबई पोलिसाच्या कामाचं गृहमंत्र्यांनी कौतुक केलं आहे.
मुंबईच्या वरळी येथील पोलीस कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या ओंकार व्हनमारे यांनी दादर (माटुंगा) येथे एका 14 वर्षीय चहाविक्रेत्या मुलाला शैक्षणिक साहित्य घेऊन घेण्यासाठी मदत केली. तसेच, आपला मोबाईल नंबर देऊन, यापुढेही शिक्षणासाठी मदत हवी असेल तर कॉल करा, असे आधारही दिला. महाराष्ट्र पोलीस वर्दीतला माणूस या फेसबुक पेजवर यासंदर्भातील बातमी शेअर करण्यात आली. त्यानंतर, थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पोलीस बांधवाच्या कामाचं कौतुक केलं आहे. आल्या ट्विटर अकाऊंटवरुन गृहमंत्र्यानी ओंकार व्हनमारे यांच्या संवेदनशीलतेचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलंय.
भविष्यात शिक्षण घेताना कोणतीही अडचण आल्यास मला संपर्क कर असा विश्वास व्हनमारे यांनी सागरला दिला. मला होतकरू, कष्टाळू व परिस्थितीची जाणीव असणाऱ्या सागरचे आणि त्याला मदत करणाऱ्या व्हनमारे यांचे खूप कौतुक वाटते. (२/२)
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) July 24, 2020
परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते,जिद्द तेव्हाच जन्माला येते. @MumbaiPolice दलातील संवेदनशील पोलीस कर्मचारी ओंकार व्हनमारे यांनी काही दिवसांपूर्वीच वडिलांचे छत्र हरविलेल्या आणि घरी आजारी असणाऱ्या आईसाठी चहा विकणाऱ्या सागर माने या मुलाला दहावीची पुस्तके व वह्या घेऊन दिल्या. भविष्यात शिक्षण घेताना कोणतीही अडचण आल्यास मला संपर्क कर, असा विश्वासही व्हनमारे यांनी सागरला दिला. मला होतकरू, कष्टाळू व परिस्थितीची जाणीव असणाऱ्या सागरचे आणि त्याला मदत करणाऱ्या व्हनमारे यांचे खूप कौतुक वाटते, असे गृहमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.