मुंबई : दुष्काळग्रस्त भागात अन्नधान्य, चारा-पाण्याची व्यवस्था करण्यासाठी श्री समस्त मुंबई जैन संघ व इतर जैन संस्थांकडून तब्बल नऊ कोटींचा निधी जमविण्यात आला आहे. त्यातून औरंगाबाद, बीड, लातूर, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांसह विदर्भातही काही ठिकाणी जलसंधारणासह इतर मदतकार्य सुरू झाले आहे. जैन संघ व संस्थेचे कार्यकर्ते गावागोवी जाऊन प्रत्यक्ष मदत कार्यात सहभागी झाले आहे. महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्ती किंवा इतर संकटाच्या वेळी मुंबई जैन संघ व जैन समाजाला मदतीसाठी आवाहन केले जाते. जीवदया ही जैन परंपरेची जननी मानली जाते. पशु व मानवाची रक्षा करणे, हे कर्तव्य असल्याचे भगवान महावीर यांनी सांगितले आहे. जैन समाज आपत्तीत मदतीसाठी कायम पुढाकार घेत आला आहे. दोन वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थितीत जैन समाजाने पाच कोटींचा निधी जमवून औरंगाबाद, सांगली आणि जालना जिल्ह्यात पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या चालविल्या होत्या.वर्धमान संस्कार धाम, श्री अहिंसा महासंघ, श्री वर्धमान परिवार, जैन अलर्ट ग्रुप, समस्त महाजन या संस्थांचे ट्रस्टी व कार्यकर्ते गावागावात पोहचून काम करणार आहेत. सध्या अमळनेर, चाळीसगाव, धुळे, मालेगाव, डोंगराले, बलसारा, अहमदनगर, संगमनेर, लातूर, अंबेजोगाई, पैठण, माणगाव आदी ठिकाणी काम सुरू झाले आहे. पावसाच्या आगमनापर्यंत हे काम सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्त भागासाठी जैन समाजाकडून मदत
By admin | Published: May 03, 2016 3:04 AM