Join us

एसआरपीएफ जवानांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 4:48 AM

जीवनापेक्षा कोणतीही मौल्यवान बाब असू शकत नाही. मात्र, अपघाताने जीवन गमावण्याची दुर्दैवी घटना घडल्यास वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या माध्यमातून राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) आपल्या जवानांच्या, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही एसआरपीएफचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी सोमवारी दिली.

मुंबई : जीवनापेक्षा कोणतीही मौल्यवान बाब असू शकत नाही. मात्र, अपघाताने जीवन गमावण्याची दुर्दैवी घटना घडल्यास वैयक्तिक अपघात विमा योजनेच्या माध्यमातून राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) आपल्या जवानांच्या, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही एसआरपीएफचे अपर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई यांनी सोमवारी दिली.कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झालेल्या हिंगोली गटाचे जवान संदीप पंढरीनाथ हातागले आणि औरंगाबाद गटाचे जवान किशोर दादाराव थाटे या जवानांच्या वारसांना अपघात विमा रकमेचा प्रत्येकी २५ लाखांचा धनादेश देण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. गोरेगाव येथील राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक ८च्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. या वेळी उपमहानिरीक्षक संदीप कर्णिक, समादेशक महेश घुर्ये, हिंगोली येथील गट क्र. १२चे समादेशक योगेश कुमार, ‘एचडीएफसी’चे रिटेल बँकिंग विभागाचे कंट्री हेड नवीन पुरी, पॅन इंडिया हेड स्मिता भगत आदी उपस्थित होते.अपघाती मृत्यू झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांप्रति सहानुभूती व्यक्त करून बिश्नोई म्हणाले, यापूर्वी अशा घटना घडल्यास मृत जवानांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी आपल्या वेतनातून रक्कम जमा करून त्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून देत असत, तसेच यापूर्वी वैयक्तिक अपघात विमा योजनेतून १० लाख रुपयांची मदत मिळत होती. मात्र ही रक्कम मर्यादित असे. अशा कुटुंबांना मदत स्वरूपात जास्त रक्कम मिळेल यादृष्टीने बँकेशी चर्चा करून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत वैयक्तिक अपघात विम्याच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विम्याची नुकसानभरपाईची रक्कम कुटुंबीयांना लवकरात लवकर मिळावी यासाठी एसआरपीएफच्या प्रत्येक गटाने बँकेच्या मदतीने कार्यशाळा आयोजित करावी, असे ते म्हणाले.>एचडीएफसीचे क्षेत्रीय प्रमुख नीलेश सामंत म्हणाले, कर्तव्य बजावत असताना कायमचे अपंगत्व अथवा अपघाती मृत्यू या कारणासाठी २५ लाख रुपये आणि अंशत: अपंगत्वासाठी ६ लाख रुपये इतकी रक्कम देण्यात येत होती. आता नवीन नियमानुसार कायमचे अपंगत्व अथवा अपघाती मृत्यू या कारणासाठी ३० लाख रुपये अशी रक्कम देण्यात येईल. या वेळी आयुर्वेद चिकित्सक आणि सुहृद फाउंडेशनच्या संचालिका डॉ. लिप्सा शहा यांच्या ‘सामान्य आजार व आयुर्वेद’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.