नुकसानग्रस्तांना सात दिवसांत मदत देणार: मुख्यमंत्री शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 06:51 AM2023-04-12T06:51:12+5:302023-04-12T06:51:29+5:30
नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.
मुंबई : नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी युद्धपातळीवर पंचनामे करून एका आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वितरित केली जाईल,अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. वनकुटे (ता. पारनेर) येथे पावसाने झालेल्या नुकसानीची मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी पाहणी केली.
वनकुटे परिसरात पडझड झालेल्या घरांची तात्पुरत्या स्वरुपात आजच उभारणी करा. नुकसान झालेल्या २२ कुटुंबांना शबरी घरकूल योजनेमधून तात्काळ पक्के घरकुले उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिवराव लोखंडे व अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी हिरामण बर्डे, कचरू वाघ यांच्या घरांची पाहणी केली. त्यानंतर बबनराव काळे, भागा पायघुडे, बबन मुसळे व बाबाजी मुसळे यांच्या पिकांची पाहणी केली.
पाच दिवस १० मिमी. पाऊसही नैसर्गिक आपत्ती
मुख्यमंत्री म्हणाले, सतत पाच दिवस १० मिलीमीटर पर्यंत पडणारा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहित धरण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा पिकांची सातबारावर नोंद नसली तरी पंचनाम्यात नोंद घेऊन भरपाई देण्यात येईल.
थेट शेतात आलो, शिंदेंचा ठाकरेंना टोला
मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही. त्यामुळे नुकसान पाहणीसाठी थेट शेतात आलो असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मुख्यमंत्र्यांनी मोर्डा व वाडीबामणी या गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे तत्त्व होते; परंतु माजी मुख्यमंत्री ठाकरे यांना तत्त्वाचा ही विसर पडला आहे. ते आता १०० टक्के राजकारण करीत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
द्राक्षबागा भुईसपाट
मुख्यमंत्र्यांनी सीताबाई सुरवसे आणि उत्तम सुरवसे (रा.मोर्डा,ता. तुळजापूर) या दाम्पत्याच्या भुईसपाट झालेल्या दोन एकर द्राक्ष बागेची पाहणी करून त्यांना धीर दिला. यावेळी धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत, तुळजापूरचे आ. राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यात २५०० हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे.
हेक्टरी ५० हजार द्या : अजित पवार यांचे पत्र
नुकसान झालेल्या पिकांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिले आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार, बेदाणा प्रक्रिया उद्योगांना भरीव मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.