Join us

महिलांच्या मदतीने धाडसत्र सुरु

By admin | Published: June 28, 2015 2:28 AM

मालवणी दारूकांडानंतर स्थानिक महिलांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाडसत्र आरंभले आहे. पोलिसांनी उत्तर मुंबईत तब्बल २५ठिकाणी धाडी घालून कारवाई केली आहे.

मुंबई : मालवणी दारूकांडानंतर स्थानिक महिलांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाडसत्र आरंभले आहे. पोलिसांनी उत्तर मुंबईत तब्बल २५ठिकाणी धाडी घालून कारवाई केली आहे.दारूकांडानंतर उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर आयुक्त फत्तेसिंह पाटील व उपायुक्त विक्रम देशमाने यांनी स्थानिक महिला आणि पोलीस यांच्या समन्वय समित्या स्थापन केल्या. दारूमुळे महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे गावठीचे अवैध गुत्ते, अवैधपणे देशी-विदेशी दारूची विक्रीबाबत महिलांकडून अचूक व खरी माहिती मिळू शकेल, हा हेतू या समित्यांमागे होता. समित्या स्थापन झाल्यानंतर पोलिसांना मोठया प्रमाणावर माहिती मिळू लागली. त्यानुसार धडक कारवाईही सुरू करण्यात आली.सध्या पोलीस उपायुक्त ते हवालदार या सर्वांनाच त्यांच्या हद्दीतील झोपडपट्टया आणि गल्लोगल्ली फिरण्याचे निर्देश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. स्वत:च्या स्वाथार्साठी पोलीसांना माहिती देणाऱ्यांपेक्षा समाजाचे हित लक्षात घेऊन पोलिसांना मदत करणाऱ्यांची संख्या वाढते आहे, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली. स्थानिक महिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही गोरेगाव मध्ये एका ठिकाणी धाड टाकत दारू विकणाऱ्या महिलेला अटक केली. काही वेळाने गोरेगावच्या एका पोलीस अधिकाऱ्याला एक निनावी फोन आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने संबंधित अटक महिले ने दारू कुठे लपविली आहे, याबाबत माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकत दारूचा साठ हस्तगत केला, असेही त्यांनी सांगितले.दारूकांडानंतर स्थानिकांकडून पोलिसांना बरीच माहिती मिळू लागली आहे. त्या जोरावर दहिसर ते गोरेगाव परिसरात सोमवार पासून अद्याप वीस ते पंचवीस ठिकाणी धाडी पडल्या.याठिकाणी छोट्या छोट्या अड्ड्यांवर गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिकाकडून त्या त्या विभागातील पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.एकंदर यामुळे भविष्यात अन्य छोटया मोठया गुन्ह्यांपासून अमली पदार्थांच्या विक्रीपर्यंतच्या गुन्ह्यांवर अंकुश बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.